Type Here to Get Search Results !

नगर परिषद प्रशासनाला शिवसेनेचा इशारा; चौकशी न झाल्यास तीव्र आंदोलन ‎

वणी :

‎       शहरातील गंगशेट्टीवार मंगल कार्यालय परिसरात ‘मॅकरून शाळे’च्या नावाने उभारण्यात येत असलेल्या बहुमजली व्यावसायिक इमारतीच्या बांधकामावरून नवीन वाद निर्माण झाला असून, शिवसेना (शिंदे गट) पदाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून आवश्यक ती कारवाई करण्याची मागणी नगर परिषद प्रशासनाकडे केली आहे.

    ‎यासंदर्भात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी वणी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन सादर केले. संबंधित ठिकाणी तीन ते चार मजली व्यावसायिक इमारतीचे बांधकाम वेगाने सुरू असल्याचे नमूद करत, या बांधकामाला नगर परिषदेकडून विधिवत परवानगी मिळाली आहे की नाही, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम व शंका निर्माण झाल्याचे निवेदनात म्हटले आहे.


‎           शिवसेनेच्या वतीने प्रशासनाकडे संबंधित बांधकामाची तातडीने चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. बांधकामास आवश्यक परवानगी नसल्यास किंवा मंजूर आराखड्याचे उल्लंघन करून काम सुरू असल्याचे आढळल्यास, ते त्वरित थांबवून मालमत्ता धारक, बांधकाम व्यावसायिक तसेच संबंधित जबाबदार व्यक्तींवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच चौकशी अहवाल आणि करण्यात आलेल्या कारवाईची माहिती लेखी स्वरूपात देण्यात यावी, अशीही अपेक्षा व्यक्त करण्यात आली.


‎         प्रशासनाने या प्रकरणाची निष्पक्षपणे व गांभीर्याने दखल घ्यावी, अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन उभारण्यात येईल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी नगर परिषद प्रशासनावर राहील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदन देताना शिवसेनेचे जिल्हा संघटक विजय चोरडिया यांच्यासह दिपक कोकास, प्रसाद ठाकरे, बाळू चेडे, विशाल किन्हेकर, मनिष सुरावार, शुभम गोरे, राहुल पारखी, संगीता मुरस्कर, मनिषा कोंगरे, भाग्यश्री वैद्य, अजिंक्य शेंडे, राजू खामनकर, मीनानाथ काकडे, सोनू पावडे आणि कपील कुंटलवार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

file-00000000607071fa94a1583f7cbced57