Type Here to Get Search Results !

MD प्रकरणात नवा चेहरा समोर, पोलिसांची कारवाई चर्चेत


 वणी  : 

‎             वणी पोलीस स्टेशनच्या हद्दीत दाखल असलेल्या एनडीपीएस कायद्यान्वये गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी आणखी एका आरोपीला अटक करून त्याच्याकडून एमडी (मेफेड्रोन) हा अमली पदार्थ व मोबाईल असा एकूण ६७ हजार ७८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

‎           पोलीस स्टेशन वणी येथे अप. क्र. ४७९/२०२६ अंतर्गत कलम ८(सी), २१(बी), २९ एनडीपीएस कायद्यान्वये गुन्ह्याचा तपास सुरू असताना, पोलिस कोठडीत असलेल्या आरोपी सौरभ दिनेश खैरे व प्रथमेश विनोद गुंडेवार (दोघेही रा. वणी) यांची सखोल चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान आरोपी अक्षय उर्फ गोलू माधव पेचे (वय २७, रा. वरोरा, जि. चंद्रपूर) याचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले.

‎          यानंतर गोपनीय बातमीदार यंत्रणा सक्रिय करून आरोपीचा शोध घेण्यात आला. आरोपी वणी शहरातच वावरत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. कायदेशीर प्रक्रियेनुसार अंगझडती घेतली असता त्याच्याकडून ७.५४ ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) अमली पदार्थ किंमत ५२ हजार ७८० रुपये तसेच एक अँड्रॉइड मोबाईल किंमत १५ हजार रुपये असा एकूण ६७ हजार ७८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली.

‎      ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भानुदास पिदुरकर यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या पथकात पोउपनि सुयोग महापुरे, पोउपनि साजीद सैय्यद, पोलीस अमलदार गणेश मेश्राम, मोनेश्वर खंडरे, नंदकुमार पुप्पलवार, निलेश आडे आणि शाम राठोड यांचा सहभाग होता. पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू ठेवला असून अमली पदार्थांच्या साखळीचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

IMG-20260612-105204

Below Post Ad

file-00000000607071fa94a1583f7cbced57