शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी वणी पोलिसांनी मोठी कारवाई करत सार्वजनिक ठिकाणी धारदार लोखंडी सत्तूर बाळगून फिरणाऱ्या एका आरोपीला रंगेहात पकडले. आरोपीविरुद्ध शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भानुदास पिदुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक रविवारी रंगारीपुरा परिसरात गस्त घालत होते. यावेळी एक इसम संशयास्पद हालचाली करताना आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडून बेकायदेशीररीत्या बाळगलेला धारदार लोखंडी सत्तूर जप्त करण्यात आला.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव महेश रमेश मोहबिया (वय ३५, रा. रंगारीपुरा, वणी, जि. यवतमाळ) असे आहे. प्राथमिक चौकशीत तो सार्वजनिक ठिकाणी गंभीर स्वरूपाचा गुन्हा करण्याच्या उद्देशाने हे घातक शस्त्र बाळगत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी वणी पोलीस स्टेशनमध्ये भारतीय शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक कपिल पाटील, पोलीस उपनिरीक्षक साजिद सैय्यद, पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन सावसाकडे, नायक पोलीस कॉन्स्टेबल विशाल राठोड, पोलीस कॉन्स्टेबल आकाश अवचारे, मोनेश्वर खंडरे, गणेश मेश्राम आणि नंदकुमार पुप्पलवार यांच्या पथकाने केली.
दरम्यान, शहरात बेकायदेशीरपणे घातक शस्त्रे बाळगणाऱ्या व गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी अशा प्रकारच्या विशेष मोहिमा पुढेही सुरू राहतील, असा इशारा वणी पोलीस प्रशासनाने दिला आहे.


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या