वणी :
शहरातील वाढत्या वाहतुकीमुळे अपघातांचा धोका कमी करण्यासाठी प्रमुख चौकांमध्ये गतिरोधक (स्पीडब्रेकर) बसविण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. मानवी हक्क सुरक्षा परिषद (ट्रस्ट) यांच्या मागणीची दखल घेत नगर परिषद वणीने ही कार्यवाही हाती घेतली असून नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे राज्याध्यक्ष राजू धावंजेवार यांच्या नेतृत्वाखाली नगर परिषदेकडे यासंदर्भात सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता. 25 सप्टेंबर 2025 रोजी मुख्याधिकारी, नगर परिषद वणी यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात शहरातील वाढती लोकसंख्या, वाहनांची वाढती संख्या आणि भरधाव वाहनांमुळे होणाऱ्या अपघातांच्या धोक्याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली होती.
निवेदनात भगतसिंग चौक, टागोर चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, टिळक चौक, विराणी टॉकीज रोड तसेच इतर वर्दळीच्या मार्गांवर गतिरोधक बसविण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार नगर परिषद प्रशासनाने शहरातील विविध महत्त्वाच्या ठिकाणी गतिरोधक उभारण्याचे काम सुरू केले असून काही ठिकाणी काम पूर्णही झाले आहे.
या उपक्रमामुळे वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार असून शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेत वाढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच भविष्यात रस्ते अपघातांचे प्रमाण कमी होण्यासही या निर्णयाचा फायदा होणार आहे.
नगर परिषद प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत घेतलेल्या या निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे. दरम्यान, या मागणीसाठी सातत्याने प्रयत्न करणारे मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे राज्याध्यक्ष राजू धावंजेवार यांच्या प्रयत्नांचेही नागरिकांकडून कौतुक करण्यात येत असून त्यांचे आभार व्यक्त केले जात आहेत.


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या