Type Here to Get Search Results !

‎शेताचा रस्ता ब्लॉक! पुतण्याची काकाला थेट जीवे मारण्याची धमकी; गुन्हा दाखल

मारेगाव :

‎           तालुक्यातील गावात एका शेतकऱ्याने शेतात जाणाऱ्या पारंपरिक रस्त्यावरून जाण्यास अडथळा निर्माण करून शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार पोलिसांत दिली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.


‎        प्राप्त माहितीनुसार, फिर्यादीची गावात शेतजमीन असून, या शेतात जाण्यासाठी शेजारील शेतमधून जाणारा रस्ता शंभर वर्षांहून अधिक काळापासून वापरात असल्याचा दावा करण्यात आला आहे. संबंधित व्यक्ती हा फिर्यादीचा सख्खा पुतण्या असून, आपसी वादातून त्याने शेतात जाणाऱ्या रस्त्यावरून ये-जा करण्यास अटकाव केल्याचे तक्रारीत नमूद आहे.


‎         फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, 11 जून 2026 रोजी सकाळी सुमारे 8 वाजता तो मुलासह बैलगाडीतून रासायनिक खत घेऊन शेतात जात असताना आरोपीने रस्त्यात अडवून बैलांचे कासरे पकडले आणि बैलगाडी थांबविली. यावेळी आरोपीने अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच भीतीपोटी खताने भरलेली बैलगाडी तेथेच ठेवून बैलांसह घरी परतावे लागल्याचे फिर्यादीने तक्रारीत म्हटले आहे.


‎        पेरणीच्या हंगामात शेतात जाण्याचा मार्ग रोखल्याने शेतीचे कामकाज ठप्प झाल्याचा दावा करत संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी फिर्यादीने केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तक्रारीच्या आधारे भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 च्या कलम 126(2), 296, 351(2) व 351(3) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Below Post Ad