वणी :
नगर वाचनालय, मित्र मंडळ, विदर्भ साहित्य संघ वणी आणि प्रेस वेलफेअर असोसिएशन, वणी यांच्या संयुक्त विद्यमाने दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचा गौरव करण्यात आला तसेच वणीची पहिली महिला वैमानिक विधी सुरेश बाजोरिया यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगर वाचनालयाचे अध्यक्ष संजीवरेड्डी बोदकूरवार होते. प्रमुख अतिथी म्हणून पोलिस निरीक्षक भानुदास पिदुरकर, मित्र मंडळाचे अध्यक्ष उत्तम गेडाम, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रा. दिलीप अलोणे आणि प्रेस वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष अनिल बिलोरिया उपस्थित होते.
सुरुवातीला स्नेहलता चुंबळे यांनी स्वागत गीत सादर केले. मार्गदर्शन करताना प्रा. अलोणे व उत्तम गेडाम यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच समाजासाठी आदर्श ठरण्याचे आवाहन केले. पोलिस निरीक्षक भानुदास पिदुरकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत यशामागील संघर्ष आणि समाजाप्रती असलेली जबाबदारी अधोरेखित केली.
यावेळी विद्यार्थिनी आरोही ढेंगळे, पालक प्रतिनिधी चंदू परेकर आणि वैमानिक विधी बाजोरिया यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात संजीवरेड्डी बोदकूरवार यांनी यशासाठी कठोर परिश्रम आणि सातत्याचे महत्त्व स्पष्ट केले.
कार्यक्रमात वणी शहरातील मराठी व इंग्रजी माध्यमातील शाळांमधील सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर एअर इंडियामध्ये वैमानिक म्हणून रुजू झालेल्या विधी सुरेश बाजोरिया यांचा शाल व श्रीफळ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. याशिवाय वणी येथे नुकतेच रुजू झालेले पोलिस निरीक्षक भानुदास पिदुरकर यांचाही सन्मान करण्यात आला.
स्व. नानाजी व लक्ष्मीबाई भागवत, स्व. बाबुरावजी देशपांडे तसेच स्व. शालिनीताई व रामदास भट यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विद्यार्थ्यांना विशेष बक्षिसांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन कासावार यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. स्वानंद पुंड यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी देवेंद्र भाजीपाले, प्रमोद लोणारे, राम मेंगावार आणि कल्पना राठोड यांनी विशेष परिश्रम घेतले.







टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या