प्रतिनिधी / मंगेश राऊत (कोरा, वर्धा) :
महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागामार्फत सन २०२३ च्या राज्यस्तरीय कृषी पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, नागपूर विभागातून वर्धा जिल्ह्याला मानाचा बहुमान मिळाला आहे. पवनी येथील युवा प्रयोगशील महिला शेतकरी प्रतिभा महाजन यांची युवा शेतकरी पुरस्कारासाठी, तर गिरड येथे कार्यरत असलेले उपकृषी अधिकारी मनोज झिबलराव गायधने यांची पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
राज्यातील कृषी व संलग्न क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी आणि कृषी अधिकाऱ्यांचा गौरव करण्यासाठी शासनाकडून दरवर्षी विविध पुरस्कार प्रदान केले जातात. सन २०२३ च्या पुरस्कारांसाठी कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष निवड बैठकीत विविध नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले असून, शासनाने त्यास अंतिम मंजुरी दिली आहे. लवकरच पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात येणार आहे.
प्रतिभा महाजन यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीत केलेले नावीन्यपूर्ण प्रयोग, तसेच उत्पादनवाढीसाठी राबविलेल्या उपक्रमांची दखल घेत त्यांची युवा शेतकरी पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. तर कृषी क्षेत्रातील उत्कृष्ट सेवा, शेतकरी हिताचे उपक्रम आणि प्रभावी कार्यपद्धतीमुळे उपकृषी अधिकारी मनोज गायधने यांची शासकीय श्रेणीतील प्रतिष्ठित कृषी सेवारत्न पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
या दोन्ही मानाच्या पुरस्कारांमुळे वर्धा जिल्ह्याचा गौरव वाढला असून, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, कृषी विभागातील अधिकारी-कर्मचारी, शेतकरी वर्ग तसेच नागरिकांकडून दोघांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
"या पुरस्कारांमुळे जिल्ह्यातील युवा शेतकरी आणि कृषी क्षेत्रातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना अधिक जोमाने व प्रेरणेने काम करण्याची ऊर्जा मिळेल," असा विश्वास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अरविंद उपरीकर यांनी व्यक्त केला.


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या