Type Here to Get Search Results !

‎उदरनिर्वाहाचे साधनही गेले, आधारवडही; विजेच्या तडाख्यात मेंढपाळ दगावला ‎

वणी :
‎ 
‎           पावसाळ्याची दमदार सुरुवात झालेली नसताना शुक्रवारी सायंकाळी वणी तालुक्यातील टाकळी शिवारात झालेल्या अवकाळी पावसादरम्यान वीज कोसळून एका मेंढपाळासह १३ शेळ्यांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून गावात शोककळा पसरली आहे.
‎         मृत मेंढपाळाचे नाव विलास तुमराम (वय ४८, रा. टाकळी) असे आहे. ते शेळीपालन करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे ते शेळ्यांचा कळप घेऊन टाकळी शिवारात चराईसाठी गेले होते. दुपारपर्यंत वातावरण सामान्य होते. मात्र सायंकाळी सुमारे ४ वाजताच्या सुमारास हवामानात अचानक बदल झाला. काळे ढग दाटून आले आणि वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली.
‎          पावसापासून बचाव करण्यासाठी विलास तुमराम यांनी शेळ्यांसह जवळील झाडाखाली आसरा घेतला. मात्र काही क्षणांतच त्या परिसरात जोरदार वीज कोसळली. विजेचा तीव्र झटका बसल्याने विलास तुमराम यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेल्या सुमारे १३ शेळ्यांचाही जागीच मृत्यू झाला. काही शेळ्या विजेच्या धक्क्यामुळे गंभीररीत्या भाजल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
‎         घटनेची माहिती जवळच्या शेतात काम करणाऱ्या शेतकरी व मजुरांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी विलास तुमराम आणि अनेक शेळ्या मृतावस्थेत आढळून आल्या. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना, ग्रामस्थांना तसेच शिरपूर पोलिसांना माहिती देण्यात आली.घटनेची माहिती मिळताच शिरपूर पोलीस व महसूल विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला असून शेळ्यांच्या नुकसानीचीही नोंद घेण्यात येत आहे.
‎        दरम्यान, ग्रामस्थांनी शासनाकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी केली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या मृत्यूबाबत नियमानुसार मदत मंजूर करावी तसेच मृत शेळ्यांच्या नुकसानभरपाईची रक्कम तत्काळ द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

file-00000000607071fa94a1583f7cbced57