वणी :
पोलीसांनी अवैध दारूविक्रीविरोधात कारवाई करत दोन वेगवेगळ्या प्रकरणांत दोन आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम 65 (ई) अन्वये गुन्हे दाखल केले आहेत.
पहिल्या प्रकरणात, 11 जून 2026 रोजी ग्राम वांजरी येथे पोलीस हवालदार अविनाश चिकराम यांनी केलेल्या कारवाईत संदीप ज्ञानेश्वर मेश्राम (वय 34, रा. वांजरी) याच्या राहत्या घरावर छापा टाकण्यात आला. घराची पंचासमक्ष झडती घेतली असता एका कागदी बॉक्समध्ये देशी दारू ‘रुपेश संत्रा’ ब्रँडच्या 90 मिली क्षमतेच्या 60 प्लास्टिक बाटल्या आढळून आल्या. जप्त करण्यात आलेल्या दारूची किंमत 2 हजार 400 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपी अवैधरित्या दारू विक्री करत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार अविनाश चिकराम करीत आहेत.
दुसऱ्या प्रकरणात, 12 जून 2026 रोजी सुकनेगाव फाटा परिसरात पोलीस कॉन्स्टेबल प्रविण जाधव यांच्या फिर्यादीवरून सतिश पांडुरंग पेटकरी (वय 32, रा. सुकनेगाव) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. संशयिताची तपासणी केली असता त्याच्या थैलीमध्ये 90 मिली क्षमतेचे देशी दारूचे 23 पव्वे आढळून आले. जप्त दारूची किंमत 920 रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. आरोपी अवैधरित्या दारू विक्रीसाठी दारू बाळगत असल्याचे आढळल्याने त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली.
दोन्ही प्रकरणांमध्ये वणी पोलीस पुढील तपास करीत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या