Type Here to Get Search Results !

‎सीक्रेट राईड उघडकीस,  पोलिसांनी थांबवली क्रूरता

‎वणी :

‎           वाघदरा फाट्यावर शनिवारी रात्री गोवंश जनावरांची अवैध व क्रूरपणे वाहतूक करणाऱ्या बोलेरो पिकअपवर वणी पोलिसांनी धडक कारवाई करत वाहनासह जनावरे जप्त केली. या प्रकरणी तीन आरोपींविरुद्ध विविध कायद्यांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.


‎         मिळालेल्या माहितीनुसार, बजरंग दलाचे कार्यकर्ते विशाल दूधबळे, रितेश पचारे व दिनेश सालवटकर हे वाघदरा गावाकडून वणीकडे येत असताना त्यांना एक संशयास्पद बोलेरो पिकअप जाताना दिसली. वाहनात गोवंश जनावरे असल्याचा संशय आल्याने त्यांनी तत्काळ वणी पोलिसांना माहिती दिली.


‎        माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि वाहनाची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान बोलेरो पिकअप (क्र. MH-32-Q-2624) मध्ये तीन बैल अत्यंत क्रूर पद्धतीने वाहतूक करत असल्याचे आढळून आले. जनावरांना आखूड दोरीने बांधून वाहनात कोंबण्यात आले होते तसेच चारा व पाण्याची कोणतीही व्यवस्था नव्हती, असे पोलिसांनी सांगितले. यामुळे जनावरांच्या जीवितास धोका निर्माण झाला होता.


‎        पोलिसांनी वाहनचालकाची चौकशी केली असता त्याने आपले नाव दुर्गाप्रसाद उर्फ आकाश चरणदास लेंगुळे (रा. शिरपूर) असे सांगितले. त्याच्यासोबत मोहन रामचंद्र आसोले व लोकेश सुरेश पडोले (दोघे रा. डोर्ली) हेही वाहनात असल्याचे समोर आले.


‎       वाहतुकीसंदर्भातील कोणतीही वैध कागदपत्रे आरोपींकडे आढळून आली नाहीत. त्यानंतर पोलिसांनी वाहन व जनावरे जप्त केली. जप्त मुद्देमालामध्ये सुमारे ९० हजार रुपये किमतीचे तीन बैल आणि २ लाख रुपये किमतीची बोलेरो पिकअप यांचा समावेश आहे.


‎      जप्त केलेली जनावरे उज्ज्वल गोरक्षण ट्रस्ट, वणी येथे सुरक्षिततेसाठी सुपूर्द करण्यात आली आहेत. या प्रकरणी प्राणी संरक्षण व प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

Healthy Indian Youth Image