स्वातंत्र्य संग्रामाच्या धगधगत्या यज्ञकुंडामध्ये स्वतःसह संपूर्ण कुटुंब राष्ट्रासाठी समर्पित करणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे जगातील एकमेव प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व होते. त्यांचे संपूर्ण जीवन राष्ट्रभक्ती, त्याग आणि संघर्षाचे प्रतीक होते. देशाच्या स्वातंत्र्यासाठी अमानुष हालअपेष्टा सहन करूनही राष्ट्रसेवेचा ध्यास न सोडणारे स्वा. सावरकर हे स्वातंत्र्य संग्रामातील प्रखर देशभक्त होते, असे प्रतिपादन माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी केले.
वणी येथील सावरकर चौकात स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. आपल्या भाषणात बोदकुरवार यांनी सावरकरांच्या क्रांतिकारी कार्याचा आणि राष्ट्रनिर्माणातील योगदानाचा आढावा घेत उपस्थितांना त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचे आवाहन केले. त्यांच्या प्रभावी मार्गदर्शनाने कार्यक्रमाला विशेष दिशा मिळाली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी गजानन कासावार यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची पार्श्वभूमी विशद केली. तसेच सावरकर चौकात स्वा. सावरकर यांचे भव्य पोर्ट्रेट उभारण्यासाठी सर्वांनी एकत्रित पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. यानंतर माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या हस्ते स्वा. सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाला भाजपचे ज्येष्ठ नेते दिनकरराव पावडे, सावरकर जयंती समितीचे प्रमुख संजय दोरखंडे, समिती सदस्य सुरेश मोरे, अनिल पोटे, सुनील ठाकरे, एकनाथ मांडवकर, डॉ. अनिरुद्ध वैद्य, संतोष इनमुलवार, विशाल झाडे, पुरुषोत्तम आक्केवार, रहीम शेख, सोनू शेख, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग संपर्कप्रमुख प्रशांत भालेराव, नगर सहकार्यवाह कवडू पिंपळकर, विशाल काळे, गजानन कौरासे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह दीपक नवले यांनी केले. यावेळी सावरकरप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या