वणी :
वणी परिसरात गोवंश जनावरांची क्रूर पद्धतीने वाहतूक करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी सलग कारवाया करत चार वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत. या कारवायांमध्ये एकूण १६ आरोपींवर महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम तसेच प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० अंतर्गत गुन्हे नोंदविण्यात आले असून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पहिल्या प्रकरणात २८ एप्रिल रोजी मोहर्ली गावाजवळ पोलिसांनी तीन पिकअप वाहनांमधून सात गोवंश जनावरे जप्त केली. आरोपी युवराज तुराणकर, सुनिल आसुटकर व अभय उईके हे जनावरांना आखूड दोरीने बांधून, चारापाण्याची कोणतीही व्यवस्था न करता वाहतूक करताना आढळले. या कारवाईत सुमारे ६ लाख रुपयांची वाहने व ३३ हजार रुपयांची जनावरे जप्त करण्यात आली.
दुसऱ्या प्रकरणात ३ मे रोजी मोहर्लीहून वणीकडे येणाऱ्या मार्गावर रेल्वे क्रॉसिंगजवळ जिब्राण शेख व पुणाजी मेश्राम यांना टाटा इंट्रा वाहनातून एक बैल व दोन गोऱ्ह्यांची अमानुष पद्धतीने वाहतूक करताना पकडण्यात आले. पोलिसांनी जनावरे व वाहन असा एकूण अंदाजे १.८१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
तिसऱ्या कारवाईत ५ मे रोजी पहाटे ड्रीम लॅन्ड सिटी, मुर्धानी रोड परिसरातून राजू गुप्ता, अनिल खैरे व शेख रिजवान यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी टाटा इंट्रा वाहनातून दोन बैलांना कोंबून नेत असल्याचे पोलिस तपासात समोर आले. या कारवाईत अंदाजे १.८० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
चौथ्या व सर्वात मोठ्या कारवाईत ५ मे रोजी सकाळी संविधान चौक, वरोरा रोड येथे चार वाहनांमधून आठ गोवंश जनावरे जप्त करण्यात आली. प्रथमेश बोरतवार, रामदास रागीट, शंकर झाडे, शरद चटकी, नंदकिशोर डोळस, लक्ष्मण घागी, गणेश दातारकर व अमीत कसारे यांच्यासह आठ जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. या कारवाईत चार वाहने व जनावरे असा मोठा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.
सर्व प्रकरणांत आरोपी जनावरांना आखूड दोरीने बांधून वाहनात कोंबून नेत होते. तसेच जनावरांसाठी चारा-पाण्याची व्यवस्था नव्हती आणि आवश्यक कागदपत्रेही आढळून आली नाहीत. पोलिसांनी सर्व आरोपींविरोधात संबंधित कलमान्वये गुन्हे दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या