मारेगाव :
तालुक्यात एका अल्पवयीन तरुणीच्या बेपत्ता होण्याच्या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. बारावीची परीक्षा उत्तीर्ण झालेली 17 वर्षीय तरुणी रात्री कुटुंबासोबत घरात झोपली; मात्र पहाटेपर्यंत ती अचानक गायब झाल्याचे समोर आले. विशेष म्हणजे, ज्या युवकासोबत तिचे प्रेमसंबंध असल्याची चर्चा होती, तो युवकही त्याच रात्रीपासून बेपत्ता असल्याने प्रकरण अधिकच गूढ बनले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कुटुंब हे शेती व वाहनचालक व्यवसायावर उदरनिर्वाह करते. घराचे बांधकाम सुरू असल्याने रात्री उशिरापर्यंत संपूर्ण कुटुंब कामात व्यस्त होते. त्यानंतर सर्वजण झोपले. पहाटे कुटुंबप्रमुख उठल्यानंतर मुलगी घरात नसल्याचे त्यांच्या लक्षात आले.
सुरुवातीला नातेवाईकांकडे चौकशी करण्यात आली. शेजारी, गाव परिसर तसेच ओळखीच्या ठिकाणी शोधाशोध करण्यात आली; मात्र तरुणीचा काहीही मागमूस लागला नाही. दरम्यान, गावातील एका 23 वर्षीय युवकासोबत तिचे प्रेमसंबंध असल्याची माहिती कुटुंबीयांनी पोलिसांना दिली. संशय अधिक गडद झाला तो म्हणजे संबंधित युवकही त्या रात्रीपासून घरात नसल्याचे समोर आले.
या घटनेनंतर कुटुंबीयांनी थेट पोलीस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली. पोलिसांनी अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याच्या संशयावरून BNS कलम 137(2) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून दोघांचा शोध सुरू केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या