तालुक्यातील मारेगाव शेतशिवारात दिवसाढवळ्या ट्रॅक्टरसह शेती अवजारे लंपास झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सागर सुरेश आवारी (वय अंदाजे 35) व त्याचे वडील सुरेश आवारी (वय अंदाजे 70, रा. मारेगाव वार्ड क्र. 05) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी सौ. बेबीताई कुर्मदास काळे (वय 73, रा. बल्लारपूर) यांनी मारेगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या मालकीची शेतजमीन गट क्रमांक 254 मध्ये असून शेतीकामासाठी त्यांनी स्वतःचा ट्रॅक्टर (MH 29 V 3463) मागील दोन वर्षांपासून आरोपींकडे ठेक्यावर दिला होता. मात्र 1 एप्रिल 2026 पासून त्यांनी शेती व ट्रॅक्टर परत घेत संबंध तोडले होते.
दरम्यान, 9 एप्रिल रोजी दुपारी सुमारास फिर्यादी आपल्या पती व मुलासह शेतात गेल्या असता, शेतात ठेवलेला ट्रॅक्टर तसेच शेतीची महत्त्वाची अवजारे गायब असल्याचे लक्षात आले. यामध्ये ट्रॅक्टर, पाण्याच्या मोटरची साधने, चैन बॉक्स, कल्टिवेटर आणि ‘व्ही फास’ अशी साधने मिळून सुमारे 1 लाख 90 हजार रुपयांचा माल चोरीला गेला आहे.
स्थानिक साक्षीदाराने आरोपी हा ट्रॅक्टर घेऊन जाताना दिसल्याचे सांगितल्याने संशय अधिक बळावला आहे. या प्रकरणी मारेगाव पोलिसांनी भा.न्या.सं. कलम 303(2), 3(5) अंतर्गत गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.
या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून “विश्वासाने दिलेला ट्रॅक्टरच चोरीला जाणे” हा प्रकार शेतकऱ्यांसाठी मोठा धक्का मानला जात आहे. पुढील तपास पोलीस हवालदार शंकर बारेकर करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या