Type Here to Get Search Results !

शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आमदार संजय देरकरांची लढाई


 ‎वणी :       

‎                तालुक्यात मागील आठ दिवसांपासून नाफेडमार्फत हरभरा खरेदी बंद असल्याने शेतकरी गंभीर आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार संजय देरकर यांनी प्रशासनाचे लक्ष वेधत हरभरा खरेदी तात्काळ सुरू करण्याची जोरदार मागणी केली आहे.


‎       आमदार देरकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना (उबाठा) शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकारी नितीन इंगोले यांची भेट घेत शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर सविस्तर चर्चा केली. यावेळी हरभरा खरेदी केंद्रे बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांकडे कमी दरात माल विकण्याची वेळ येत असल्याचे सांगण्यात आले. काही व्यापारी शेतकऱ्यांकडून अवाजवी कपात करत असून अडतच्या नावाखाली आर्थिक शोषण होत असल्याचा आरोपही करण्यात आला.

‎      आधीच नापिकी, अवकाळी पाऊस आणि वाढत्या उत्पादन खर्चामुळे शेतकरी संकटात असताना नाफेड खरेदी बंद राहिल्याने त्यांची आर्थिक कोंडी वाढली आहे. खरीप हंगामाची तयारी सुरू असताना शेतकऱ्यांना भांडवलाची गरज असून हरभरा विक्री रखडल्याने तालुक्यात तीव्र नाराजीचे वातावरण आहे.

‎        आ. संजय देरकर यांनी प्रशासनाकडे नाफेडची हरभरा खरेदी तातडीने सुरू करण्याची मागणी केली. तसेच खासगी बाजारातील अनियमित व्यवहारांवर नियंत्रण ठेवून बेकायदेशीर खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करावी, शेतकऱ्यांकडून घेतली जाणारी अडत बंद करावी आणि नाफेड केंद्रांवर ५० किलोमागे होत असलेली १०० रुपयांची अवैध कपात थांबवावी, अशी मागणीही त्यांनी केली.

‎        या मागण्यांवर उपविभागीय अधिकारी नितीन इंगोले यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली असून प्रशासनाने तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शिवसेना (उबाठा) ठामपणे उभी असून प्रशासनाने त्वरित निर्णय न घेतल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.


‎         यावेळी जिल्हाप्रमुख संजय निखाडे, तालुकाप्रमुख संतोष कुचनकर, शहरप्रमुख विनोद ढुमणे, गटनेते सुधीर थेरे, महेश सोमलकर, तुलसी तेवर, राजीव पाटील, अनिकेत बतखल, शत्रुघ्न मालेकर, शंकर देरकर, सचिन पाटील, राजू गोलाईत, साबीर भाई आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

Healthy Indian Youth Image