Type Here to Get Search Results !

संजय देरकरांची घटनास्थळी धाव; वेकोलि अधिकाऱ्यांना धारेवर


 वणी : 

‎             वेकोलि अंतर्गत उकनी कोळसाखाणीत शुक्रवारी भीषण दुर्घटना घडल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. भूगर्भातून कोळसा उत्खनन सुरू असताना साचलेल्या गाळयुक्त पाण्याला रोखून धरणारा मातीचा संरक्षक शिल्ड अचानक फुटल्याने चिखल, गाळ आणि पाण्याचा प्रचंड लोंढा उत्खनन क्षेत्रात घुसला. या दुर्घटनेत कोळसा वाहतूक करणारे दोन महाकाय डंपर चिखलात गाडले गेले. मात्र चालकांनी प्रसंगावधान राखून वेळेत बाहेर पडल्याने मोठी जीवितहानी टळली.


‎            प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, काही क्षणांपूर्वी सुरळीत सुरू असलेले उत्खनन अचानक संकटात बदलले. मातीचा शिल्ड फुटताच प्रचंड वेगाने आलेल्या गाळयुक्त पाण्यामुळे संपूर्ण परिसर हादरून गेला. काही सेकंदांतच दोन डंपर खोल चिखलात रुतले. घटनेनंतर खाण परिसरात एकच गोंधळ उडाला असून कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


‎             घटनेची माहिती मिळताच वणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय देरकर यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी उपक्षेत्रीय प्रबंधक स्वामी व संबंधित अधिकाऱ्यांची घटनास्थळीच कानउघाडणी करत सुरक्षा व्यवस्थेतील गंभीर त्रुटींवर तीव्र नाराजी व्यक्त केली.

‎             यावेळी बोलताना आमदार संजय देरकर म्हणाले, “वेकोलि प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे कामगारांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. आज सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असली तरी अशा दुर्घटना पुन्हा घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील. सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन, नियमित तांत्रिक तपासणी आणि संभाव्य धोक्यांचे पूर्वनियोजन याबाबत तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात.”

‎            आमदार देरकर यांनी दुर्घटनेची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच खाण क्षेत्रातील सर्व सुरक्षा यंत्रणांची तातडीने तपासणी करून कामगारांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश दिले.

‎          घटनास्थळी आमदार देरकर यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे वेकोलि अधिकाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाली. कामगारांच्या सुरक्षिततेसाठी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नसल्याचा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला.

‎         यावेळी जिल्हाप्रमुख संजय निखाडे, टिकाराम खाडे, संजय देठे, गुलाब आवारी, जगणं जनगरी, विनोद घुमने, अजय दुबे, शंकर दरेकर यांच्यासह मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

Healthy Indian Youth Image