येथे राहणाऱ्या एका तरुण विवाहित महिलेला चंद्रपूर येथील सासरी हुंड्याच्या मागणीसाठी सातत्याने मानसिक व शारीरिक छळ करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी BNS 2023 अंतर्गत कलम 85 तसेच इतर संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लग्नानंतर काही दिवस सर्व काही सुरळीत असताना अचानक पती व सासरच्या मंडळींकडून पैशांची मागणी सुरू झाली. “हुंडा मिळाला नाही” या कारणावरून महिलेला वारंवार टोमणे, धमक्या आणि मारहाण सहन करावी लागली.
महिलेच्या तक्रारीनुसार, सासरच्यांनी पतीला भडकवून “पत्नीला सोडून दे, दुसरे लग्न लावून देतो” असा दबाव टाकला. तसेच मोटारसायकल खरेदीसाठी माहेरहून पैसे आणण्याची जबरदस्ती करण्यात आली. महिला गरीब कुटुंबातील असल्याने पैसे आणण्यास नकार दिल्यावर तिच्यावर अत्याचार करण्यात आले आणि अखेर तिला घराबाहेर हाकलण्यात आले.
या सर्व प्रकारामुळे पीडितेला वणी येथील माहेरी आश्रय घ्यावा लागला. कुटुंबाने संसार टिकावा म्हणून समेटाचा प्रयत्न केला, मात्र छळ थांबला नाही. अखेर त्रस्त झालेल्या महिलेने महिला समेट कक्षात तक्रार केली; परंतु तोडगा न निघाल्याने तिने वणी पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली आहे.
या प्रकरणामुळे पुन्हा एकदा हुंडाबळी व कौटुंबिक अत्याचाराचा प्रश्न ऐरणीवर आला असून, आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे. महिलांवरील अशा प्रकारच्या अत्याचारांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या