वणी :
विठ्ठलवाडी येथे गुरुदेव सेवा मंडळ चॅरिटेबल ट्रस्टतर्फे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती ‘ग्रामजयंती’ म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या महोत्सवात ग्रामगीतेच्या ओव्यांतून राष्ट्रसंतांच्या विचारांचा जागर साकारत संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले.
गाव म्हणजे केवळ वस्ती नसून संस्कार आणि माणुसकीच्या धाग्यांनी विणलेले एक सुंदर जीवन आहे, याची प्रचिती या ग्रामजयंती महोत्सवातून आली. कार्यक्रमाची सुरुवात घटस्थापनेने झाली. त्यानंतर सामुदायिक ध्यान, प्रार्थना, भजन आणि कीर्तन यामुळे वातावरण भक्तिरसात न्हाऊन निघाले. ग्रामस्थांच्या ओठावर नामस्मरण तर अंतःकरणात राष्ट्रसंतांचे विचार झळकत होते.
यावेळी ग्रामजयंतीचे औचित्य साधून विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. उत्कृष्ट वारली चित्रकार तथा पोलीस निरीक्षक शेखर वांढरे, व्यसनमुक्ती व स्वच्छतादूत राम झिले, गजानन देवगडे आणि संतोष खिरटकर यांना शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व ग्रामगीता भेट देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमात ग्रामगीताचार्य वैजनाथ खडसे, विजया दहेकर, गुणवंत पचारे आणि ह.भ.प. शरद वैद्य यांनी “गावा गावाशी जागवा, भेदभाव हा समूळ मिटवा, उजळा ग्रामोन्नतीचा दिवा” या राष्ट्रसंतांच्या विचारांना उजाळा दिला.
सत्कारमूर्ती शेखर वांढरे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, हा सन्मान आमचा नसून समाजासाठी कार्य करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या कार्याचा गौरव आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा प्रचारक मारोती ठेंगणे होते. तसेच शेखर वांढरे, राम झिले, गजानन देवगडे, संतोष खिरटकर हे सत्कारमूर्ती म्हणून तर राजेंद्र कोरडे हे अतिथी म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामगीताचार्य वैजनाथ खडसे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रमोद राजुरकर, हरीभाऊ भट, पुंडलिक धोबे, संजय खाडे, लक्ष्मण जुमनाके, ज्ञानेश्वर कडुकर, भय्याजी तेजे, भास्कर (पत्रकार), बाबाराव कुडमेथे, देविदास शेटे, शंकर किनाके, प्रभा आसेकर, शारदा बलकी, संगीता पेंदोर, रज्जू पारखी, सिंधु गिरडकर, बेबी दानव, रूंदा पाटेकर, नाना बदखल, मनोहर झाडे तसेच गुरुदेव उपासकांनी सहकार्य केले.



टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या