Type Here to Get Search Results !

मोबाईलच्या युगात वाचन महत्त्वाचे – संजीवरेड्डी बोदकुरवार

वणी :

‎            आजच्या धावपळीच्या जीवनात वाचनाची संस्कृती दिवसेंदिवस लोप पावत चालली असून पालकांच्या हातात पुस्तकाऐवजी मोबाईल दिसत असल्याने मुलांवर अपेक्षित संस्कार होत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड आणि संस्कृती रुजवणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन माजी आमदार तथा नगर वाचनालयाचे अध्यक्ष संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी केले. ते नगर वाचनालयात आयोजित बालवाचन सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.


‎            विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण होऊन त्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावाव्यात या उद्देशाने नगर वाचनालय, वणी यांच्या वतीने १ मे महाराष्ट्र दिनी बालवाचन सप्ताहास प्रारंभ करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ साहित्य संघ, वणीचे सचिव प्रा. अभिजित अणे होते. प्रमुख अतिथी म्हणून स्नेहलता चुंबळे, सुनील वाटेकर व वैजनाथ खडसे उपस्थित होते.


‎          कार्यक्रमाची सुरुवात स्नेहलता चुंबळे यांनी सादर केलेल्या महाराष्ट्र गीत व बालगीताने झाली. यानंतर मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वाचनाचे महत्त्व अधोरेखित केले.


‎           अध्यक्षीय भाषणात प्रा. अणे यांनी बोधप्रद गोष्ट सांगत ‘वाचाल तर वाचाल’ हा संदेश दिला. १ ते ७ मे दरम्यान आयोजित या बालवाचन सप्ताहात विद्यावाचस्पती स्वानंद पुंड, डॉ. सुवर्णा चरपे, शेखर वांढरे, स्नेहलता चुंबळे, सुनील वाटेकर, वैजनाथ खडसे व प्रवीण सातपुते आदी मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहे.


‎          कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाचनालयाचे सचिव गजानन कासावार यांनी केले, तर आभार प्रदर्शन संचालक अर्जुन उरकुडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी देवेंद्र भाजीपाले, प्रमोद लोणारे, राम मेंगावार व कल्पना राठोड यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad