यवतमाळ :
विवाहितेला मूलबाळ नसल्याच्या कारणावरून मानसिक व शारीरिक छळ करून घराबाहेर काढल्याप्रकरणी यवतमाळ शहर पोलिसांनी पती, सासू, दिर आणि जाऊ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणातील आरोपींमध्ये प्रशांत ज्ञानदेव साठे, बेबीताई ज्ञानदेव साठे, प्रविण ज्ञानदेव साठे आणि अश्विनी प्रविण साठे ( ता. जि. अकोला) यांचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेचा विवाह २०१९ मध्ये प्रशांत साठे यांच्यासोबत झाला होता. विवाहानंतर सुरुवातीचे काही महिने सर्व काही सुरळीत सुरू होते. मात्र त्यानंतर घरगुती कारणांवरून वारंवार वाद घालत पती व सासरच्या मंडळींकडून मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, पती प्रशांत साठे हे वारंवार माहेरहून पैसे आणण्याचा तगादा लावत होते. तसेच लग्नाला अनेक वर्षे होऊनही मूलबाळ नसल्याने सासू बेबीताई साठे, दिर प्रविण साठे व जाऊ अश्विनी साठे हे महिलेला “वांझोटी” म्हणत अपमानास्पद वागणूक देत असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
७ ऑगस्ट २०२५ रोजी घरातील कामाच्या कारणावरून वाद निर्माण झाला. त्यावेळी पतीने शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप आहे. सततच्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून संबंधित महिला रक्षाबंधनानिमित्त माहेरी यवतमाळ येथे भावाकडे राहण्यासाठी आल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर आरोपींनी तिला परत नेण्यासाठी कोणतीही पुढाकार घेतला नसल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान, राज्य महिला आयोगामार्फत पंचायत समिती नेर येथे समुपदेशन प्रक्रिया पार पडली होती. ५ जानेवारी २०२६ रोजी समझोता झाल्यानंतरही आरोपींनी “तुला नांदवणार नाही” असे सांगत शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
यानंतर संबंधित महिलेने यवतमाळ शहर पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी प्रकरण समेटासाठी भरोसा सेलमध्ये पाठविले होते. मात्र तेथेही समेट न झाल्याने अखेर चारही आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या