Type Here to Get Search Results !

रात्री 1.30 वाजता गेटवर धडका; काही मिनिटांत रक्तरंजित संघर्ष ‎

वणी :

‎        यवतमाळ जिल्ह्यातील वणी शहरात कौटुंबिक वादातून झालेल्या हल्ल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीला त्रास देत असल्याच्या संशयावरून मेव्हण्याने काही साथीदारांसह घरावर धाड टाकत तरुणावर चाकूने हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या हल्ल्यात तरुणासह त्याचे काका आणि काकू गंभीर जखमी झाले.


‎        मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय राजेंद्र बोढे (28, रा. शास्त्री नगर, वणी) यांचे लग्न मार्च 2024 मध्ये झाले होते. लग्नानंतर पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत असल्याचे सांगितले जाते. काही महिन्यांपूर्वी पत्नी माहेरी गेली होती. त्यानंतर मुलाच्या कारणास्तव तिला पुन्हा घरी आणण्यात आले होते.


‎         फिर्यादीनुसार, 29 मे रोजी पहाटे सुमारे 1.30 वाजता पत्नीचा भाऊ अमन रामानंद घागी हा चार ते पाच युवकांसह अक्षय यांच्या घरासमोर आला. गेट वाजवून बाहेर बोलावल्यानंतर "माझ्या बहिणीला त्रास का देतो?" असा जाब विचारत साथीदारांना अक्षयला पकडण्यास सांगितले. त्यानंतर अमनने धारदार शस्त्राने अक्षय यांच्या खांद्यावर वार केल्याचा आरोप आहे.


‎          अक्षय यांचा आरडाओरडा ऐकून त्यांचे काका विजय बोढे आणि काकू बालिताई बोढे मदतीसाठी धावले. मात्र त्यांनाही धारदार शस्त्राने जखमी करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. हल्ल्यानंतर आरोपी व त्याचे साथीदार घटनास्थळावरून फरार झाले.


‎        जखमींना प्रथम वणी येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना चंद्रपूर येथील हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 मधील विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad