Type Here to Get Search Results !

‎12 वर्षांच्या मुलीसमोर आईचा खून ?  थरारक घटना

राजुरा : 

‎             तालुक्यातील धोपटाळा कॉलनी येथे एका 37 वर्षीय विवाहित महिलेचा अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून राजुरा पोलीस अधिक तपास करीत आहेत.

‎           मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिला शितल रणधिर कुंभारे या उन्हाळी सुट्टी व कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त आपल्या आईच्या घरी, धोपटाळा कॉलनीतील WCL क्वॉर्टर क्रमांक 52/2 येथे मुलगी निरीक्षासह मुक्कामी आल्या होत्या. त्यांचे पती रणधिर कुंभारे हे चंद्रपूर येथे GPS बसविण्याचा व्यवसाय करतात.

‎          तक्रारीनुसार, 28 मे रोजी सायंकाळी पती-पत्नीमध्ये फोनवर शेवटचे संभाषण झाले होते. त्यानंतर 29 मे रोजी सकाळी शेजाऱ्यांकडून शितल कुंभारे यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती रणधिर कुंभारे यांना मिळाली. ते तातडीने धोपटाळा येथे पोहोचले असता घरातील शेवटच्या खोलीत शितल कुंभारे रक्ताच्या थारोळ्यात पालथ्या अवस्थेत पडलेल्या दिसल्या. घटनास्थळी रक्ताने माखलेला रुमालही आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता महिलेचा गळा धारदार शस्त्राने चिरल्याचे स्पष्ट झाले.

‎           मृत महिलेची 12 वर्षीय मुलगी निरीक्षा हिने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, रात्री सुमारे 12 वाजता तिची आजी आणि मामा तेलंगणातील कालेश्वरम येथे गेल्याचे सांगितले. त्यानंतर ती आणि तिची आई घरात झोपल्या होत्या. सकाळी उठल्यानंतर आई बेडवर नसल्याने शोध घेतला असता त्या रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आल्या. तक्रारीत अज्ञात आरोपीने घरात प्रवेश करून शितल कुंभारे यांचा खून केल्याचा तसेच त्यांचा POCO कंपनीचा मोबाईल फोन घेऊन गेल्याचा आरोप करण्यात आला आहे.

‎          या प्रकरणी राजुरा पोलीसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 103(1) (खून) आणि कलम 332(a) अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. घटनास्थळावरील पुरावे, मोबाईल कॉल रेकॉर्ड आणि इतर तांत्रिक बाबींच्या आधारे आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ‎या घटनेमुळे धोपटाळा कॉलनी व परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली आहे.

‎(टीप: ही बातमी उपलब्ध तक्रार/एफआयआरमधील माहितीनुसार तयार करण्यात आली आहे. तपास पूर्ण होईपर्यंत सर्व आरोप हे आरोपच मानले जातील.)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

Healthy Indian Youth Image