वणी :
तालुक्यातील नांदेपेरा येथे कचऱ्याची बाटली घराजवळ ठेवल्याच्या क्षुल्लक कारणावरून शेजाऱ्यांमध्ये वाद होऊन एका 66 वर्षीय वृद्ध शेतकऱ्याला लाकडी काठीने मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी वणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यशवंत खामणकर (वय 66) हे पत्नी व मुलासह शेतातील कामासाठी गेले होते. दुपारी घरी परतल्यानंतर शेजारी राहणारे मुकेश खामणकर व त्यांची पत्नी हे यशवंत यांच्या सुनेशी शिवीगाळ करत असल्याचे दिसून आले.
याबाबत जाब विचारताच कचऱ्याची बाटली घराजवळ ठेवल्याच्या कारणावरून वाद अधिकच चिघळला. आरोपानुसार, मुकेश च्या पत्नीने यशवंत यांची कॉलर पकडून मारहाण केली, तर मुकेशने हातातील लाकडी काठीने त्यांच्या डोक्यावर प्रहार केला. या हल्ल्यात यशवंत यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्तस्राव झाला.
दरम्यान, भांडण सोडविण्यासाठी आलेल्या यशवंत यांचा मुलगा भुषण खामणकर व सून यांनाही आरोपी दाम्पत्याने थपडा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. तसेच पुन्हा वाद केल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
जखमी अवस्थेत तक्रारदाराला ग्रामीण रुग्णालय, वणी येथे उपचारासाठी पाठविण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्यांना चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले. उपचारानंतर त्यांनी वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या प्रकरणी वणी पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 च्या कलम 115(2), 118(1), 352, 351(2), 351(3) व 3(5) अंतर्गत गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या