वणी :
सिद्धार्थ वसतीगृह, वणीच्या वतीने संस्थेचे संचालक प्रा. घनश्यामजी धाबर्डे यांचा अमृत महोत्सवी (७५ वा) वाढदिवस अत्यंत उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष मा. प्रा. पुरुषोत्तमजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. प्रा. रंजन रासेकर व प्रा. भीमराव तामगाडगे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात तथागत भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना मेणबत्ती व अगरबत्ती प्रज्वलित करून अभिवादनाने करण्यात आली. यावेळी संस्थेचे पदाधिकारी नवनाथ नगराळे, बाळासाहेब राजूरकर, जगदीश भगत व अॅड. दौलतराव वानखेडे उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी प्रा. धाबर्डे यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडत त्यांच्या कार्याचा गौरव केला.
सत्काराला उत्तर देताना प्रा. घनश्याम धाबर्डे यांनी सांगितले की, त्यांनी आयुष्यभर विविध क्षेत्रांत कार्य केले असले तरी विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी काम करणे हेच आपले प्रमुख ध्येय राहिले आहे.
अध्यक्षीय भाषणात प्रा. पुरुषोत्तम पाटील यांनी नमूद केले की, प्रा. धाबर्डे निवृत्तीनंतरही सामाजिक व धार्मिक कार्यात सक्रिय आहेत. वणी शहरात असताना त्यांनी समाजाला दिशा देण्याचे कार्य केले, तर नागपूर येथे स्थलांतरानंतरही विविध उपक्रमांत ते तेवढ्याच उत्साहाने सहभागी झाले. त्यांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित कार्यकर्ते हे त्यांच्या व्यापक सामाजिक कार्याचे प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच, पत्नीच्या निधनानंतरही खचून न जाता त्यांनी धम्मसंगोष्टी, बुद्धविहार समन्वय समिती, मृत्यूनंतर अवयवदान चळवळ, संविधान प्रसार-प्रचार आणि पाली भाषेचा प्रचार-प्रसार अशा विविध उपक्रमांत सक्रिय सहभाग नोंदविला असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव नवनाथ नगराळे यांनी केले. संचलन व आभार प्रदर्शन अधीक्षक मंगल तेलंग यांनी केले. वसतीगृहातील सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सांगता स्नेहभोजनाने करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सेवक कैलाश वडस्कर, गुलाब भोयर व सौ. निलीमा भोयर यांनी विशेष सहकार्य केले.


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या