Type Here to Get Search Results !

गजानन कासावार यांची संकल्पना प्रत्यक्षात; विद्यार्थी साहित्य संमेलनाला प्रारंभ

वणी :

‎              अमरावती विद्यापीठांतर्गत शिक्षण घेणाऱ्या पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त साहित्यिक गुणांना वाव देण्यासाठी दरवर्षी विद्यार्थी साहित्य संमेलन आयोजित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या उपक्रमाची सुरुवात यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून करण्यात आली आहे.


‎              या संदर्भात विद्यापीठाचे अधिसभा सदस्य गजानन कासावार यांनी 29 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या अधिसभेच्या बैठकीत प्रस्ताव मांडला होता. विद्यार्थ्यांमध्ये असलेली सृजनशीलता, लेखन कौशल्य आणि साहित्यिक जाण लक्षात घेऊन त्यांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली होती. हा प्रस्ताव अधिसभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला.


‎          यानंतर या निर्णयाची अंमलबजावणी विद्यार्थी विकास विभागाकडे सोपविण्यात आली. कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते आणि विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. राजीव बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाला गती देण्यात आली. विभागाकडून सर्व संलग्न महाविद्यालयांना दरवर्षी विद्यार्थी साहित्य संमेलन आयोजित करण्याचे आदेशही निर्गमित करण्यात आले आहेत.


‎        संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठांतर्गत मराठी वाङ्मय हा महत्त्वाचा विषय असून अनेक महाविद्यालयांमध्ये उदयोन्मुख साहित्यिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार मातृभाषेला प्रोत्साहन देणे आणि विद्यार्थ्यांच्या साहित्यिक प्रतिभेला व्यासपीठ उपलब्ध करून देणे हे विद्यापीठाचे शैक्षणिक कर्तव्य असल्याचे कासावार यांनी आपल्या प्रस्तावात नमूद केले होते.


‎              या उपक्रमाची प्रत्यक्ष सुरुवात श्रीमती राधादेवी गोयनका महाविद्यालय, अकोला आणि विदर्भ महाविद्यालय, बुलढाणा येथे करण्यात आली आहे. या संमेलनांमधून विद्यार्थ्यांना त्यांच्या साहित्यकृती सादर करण्याची संधी मिळणार असून नव्या साहित्यिकांना प्रोत्साहन मिळणार आहे.

‎विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार असून भविष्यात राज्यातील इतर शैक्षणिक संस्थांसाठीही हा एक आदर्श ठरू शकतो, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad