आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत, अभ्यासू भाष्यकार, वैचारिक मार्गदर्शक तसेच ज्येष्ठ पत्रकार प्रा. रंजित मेश्राम (वय ८०) यांचे ४ मार्च रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंच, वणी यांच्या वतीने ७ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता स्थानिक विश्रामगृह येथे श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला विचारमंचचे ज्येष्ठ सल्लागार प्रा. पुरुषोत्तम पाटील यांनी प्रा. रंजित मेश्राम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मेणबत्ती प्रज्वलित केली. त्यानंतर उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी बोलताना प्रा. पुरुषोत्तम पाटील यांनी प्रा. रंजित मेश्राम यांच्या जीवनकार्याचा सविस्तर आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, प्रा. मेश्राम हे आंबेडकरी चळवळीतील अभ्यासू विचारवंत आणि समाजप्रबोधन करणारे प्रभावी व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी आपल्या लेखनातून, पत्रकारितेतून आणि वैचारिक मार्गदर्शनातून वंचित व शोषित समाजाच्या प्रश्नांना आवाज दिला.
प्रा. पाटील यांनी सांगितले की, प्रा. रंजित मेश्राम यांनी भारिप बहुजन महासंघाच्या महाराष्ट्र अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळताना समाजातील वंचित घटकांच्या हक्कासाठी सातत्याने लढा दिला. तसेच साहित्य, पत्रकारिता आणि सामाजिक चळवळीच्या माध्यमातून त्यांनी आंबेडकरी विचार समाजाच्या प्रत्येक स्तरापर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले.
प्रा. रंजित मेश्राम यांच्या निधनामुळे आंबेडकरी विचारविश्वात निर्माण झालेली पोकळी ही कधीही भरून न निघणारी आहे. समाजातील साहित्यिक, अभ्यासक आणि तरुण कार्यकर्त्यांनी पुढे येऊन वंचित समाजाच्या समस्या आणि वेदना समाजापुढे मांडल्या पाहिजेत. आंबेडकरी विचारांची पेरणी अधिक व्यापकपणे करणे हीच प्रा. मेश्राम यांना खरी आदरांजली ठरेल, असेही प्रा. पुरुषोत्तम पाटील यांनी यावेळी नमूद केले.
या श्रद्धांजली सभेचे अध्यक्षस्थान विचार मंचचे अध्यक्ष बंडू कांबळे यांनी भूषविले. कार्यक्रमाला विचार मंचचे उपाध्यक्ष संजय तेलंग, घनश्याम ठमके, रामदास कांबळे, पुंडलिक पथाडे, विवेक तेलंग, कवडू जीवणे, मंगल तेलंग, दादाजी घडले, गौतम धोटे, राजेश पुनवटकर, गंगाधर रामटेके तसेच अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन रमेश तेलंग यांनी केले.
कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्ष बंडू कांबळे यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त करत प्रा. रंजित मेश्राम यांच्या कार्याला अभिवादन केले आणि त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन केले.



टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या