प्रभू श्रीराम नवमी उत्सव शोभायात्रा समितीतर्फे भव्य व दिव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. अनेक वर्षांपासून वणीमध्ये ही परंपरा अखंडपणे सुरू आहे. प्रभू श्रीरामाच्या जन्मोत्सवानिमित्त वणी येथे रामरथासह शोभायात्रा काढण्यात येणार आहे.
यावर्षी दिनांक २६ मार्च, गुरुवार रोजी ही शोभायात्रा समितीचे अध्यक्ष रवी बेलुरकर यांच्या नेतृत्वात निघणार आहे. या शोभायात्रेमध्ये विविध देखावे सादर करण्यात येणार असून, अयोध्यातील रामललाची देखणी जिवंत प्रतिमा विशेष आकर्षण ठरणार आहे. तसेच हरियाणातील लाईव्ह हनुमान हे देखील आकर्षणाचे केंद्र राहणार आहे.
वणी शहरात भक्तिमय वातावरण निर्माण करण्यासाठी शेगाव येथील श्री गजानन महाराज देवस्थानाचे भजन मंडळ तसेच विविध ठिकाणांहून आलेली भजन मंडळी आपली कला सादर करणार आहेत. याशिवाय रामरथ, रामपालखी, घोडे, विविध बँड पथके आणि अनेक पालख्या यांचा समावेश शोभायात्रेत असेल.
ही शोभायात्रा दिनांक २६ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता जुने स्टेट बँकजवळील पुरातन राम मंदिर येथे प्रभू श्रीरामाच्या रामरथाचे पूजन करून सुरू होईल. त्यानंतर ही शोभायात्रा राम मंदिर (जुने स्टेट बँक), शाम टॉकीज चौक, काळाराम मंदिर मार्गे श्री रंगनाथ मंदिर चौक, भगतसिंग चौक, गाडगेबाबा चौक, सरोदे चौक, टागोर चौक, तुटी कमान, गांधी चौक, खाती चौक, टिळक चौक, आंबेडकर चौक या मार्गाने पुन्हा राम मंदिर येथे येऊन पोहोचेल. यानंतर महाआरतीने शोभायात्रेचा समारोप होईल.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या