झरी :
अडेगाव येथील जिजाऊ ज्ञान मंदिर कॉन्व्हेंट येथे नुकताच सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृतीची जाणीव जागृत करणे, परंपरांविषयी आत्मीयता निर्माण करणे आणि त्यांच्या अंगी असलेला आत्मविश्वास वृद्धिंगत करणे हा या कार्यक्रमामागील मुख्य उद्देश होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक श्री. संदीप आसुटकार होते, तर प्रमुख अतिथी म्हणून सौ. संगीताताई संजयजी खाडे यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे उद्घाटन अडेगावच्या सरपंच सौ. गंगाताई काटकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक, ग्रामपंचायत सदस्य तसेच पालक प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सौ. कविताताई चिटकी, श्री. नितेशभाऊ ठाकरे, माजी सरपंच अरुण हिवरकर, तंटामुक्ती अध्यक्ष श्री. देव येवले यांच्यासह इतर मान्यवरांनी कार्यक्रमास हजेरी लावून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक सादरीकरणांतून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविले. पारंपरिक नृत्य, देशभक्तीपर सादरीकरणे आणि सामाजिक संदेश देणारे उपक्रम यांमुळे उपस्थितांची मने जिंकली. मान्यवरांनी शाळेच्या या उपक्रमाचे कौतुक करत, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा कार्यक्रमांची आवश्यकता अधोरेखित केली.
या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामागे नम्रता आसूरकर, नीलिमा ठाकरे आणि बेबी ठाकरे या शिक्षक व कर्मचारी वर्गाचे विशेष परिश्रम दिसून आले. कार्यक्रमाचे नियोजन आणि व्यवस्थापन उत्तमरीत्या पार पाडल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन वनिता खोबरे आणि दीक्षा झाडे यांनी केले. आपल्या ओघवत्या व आत्मविश्वासपूर्ण शैलीत त्यांनी कार्यक्रमाला रंगत आणली. शेवटी नम्रता आसुटकर यांनी उपस्थित मान्यवर, पालक आणि सहकाऱ्यांचे आभार मानले.
एकंदरीत, जिजाऊ ज्ञान मंदिर कॉन्व्हेंट, अडेगाव येथील हा सांस्कृतिक सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडून विद्यार्थ्यांच्या कला, संस्कार आणि आत्मविश्वासाला नवी दिशा देणारा ठरला.




टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या