दि. 28 फेब्रुवारी येथील शेतकरी मंदिरात कवी तथा साहित्यिक डॉ. विनोदकुमार आदे यांच्या ‘बाप’ या कवितासंग्रहाच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन दिमाखात पार पडले. या सोहळ्यास अभिनेते व सुप्रसिद्ध कवी किशोर बळी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
डॉ. आदे यांनी या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे मुखपृष्ठ, आतील रेखाचित्रे, ग्राफिक्स आणि टायपिंगपासून सर्व काम स्वतः सांभाळले आहे. ज्येष्ठ साहित्यिक व ‘तरुण भारत’चे मुख्य संपादक शैलेश पांडे यांनी पुस्तकाच्या ब्लर्बमधून ‘बाप’ या विषयाला जिवंत स्पर्श दिला आहे.
साहित्यात ‘आई’ या विषयावर विपुल लेखन झाले असताना ‘बाप’ या विषयाकडे तुलनेने दुर्लक्ष झाले आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. आदे यांनी ‘बाप’ या विषयावर कवितासंग्रह प्रकाशित करून एक वेगळा आणि धाडसी प्रयोग साकारला आहे. त्यांच्या कवितांमधून बापाच्या त्याग, कष्ट, स्वाभिमान आणि संघर्षाचे वास्तव चित्रण दिसून येते.
या कवितांमध्ये गरिबी, कष्ट आणि जीवनातील संघर्ष यांचे जिवंत दर्शन घडते. बाप हा केवळ एक व्यक्ती नसून संपूर्ण संसाराचा आधारस्तंभ आहे, हे कवीने प्रभावीपणे मांडले आहे. त्यांच्या लेखणीतून बुद्ध, कबीर, तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज, भगतसिंग आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या महापुरुषांच्या गुणांचे प्रतिबिंब बापाच्या स्वभावात उभे केले आहे.
कार्यक्रमात उपस्थितांनी या कवितासंग्रहाचे कौतुक करत वाचकांनी हा संग्रह आवर्जून वाचावा, असे आवाहन केले. शेवटी बापाच्या निधनाच्या प्रसंगी उमटणाऱ्या भावनांचे हृदयस्पर्शी चित्रण कवितांमधून व्यक्त झाले असून, या काव्यसंग्रहाने उपस्थितांच्या मनाला भिडणारा ठसा उमटवला.
— दत्ता डोहे
प्रकाशक, स्वराज पब्लिकेशन, वणी
जय ज्योती | जय क्रांती | जय जिजाऊ | जय भीम

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या