वेगाव येथील एका विवाहित महिलेने पाच लाख रुपयांच्या कथित मागणीसाठी तिच्या पतीविरोधात गंभीर स्वरूपाचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा दावा पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीत केला असून, या प्रकरणामुळे परिसरात चर्चा सुरू झाली आहे.
फिर्यादीच्या तक्रारीनुसार, ओळखीच्या एका महिलेचे फिर्यादीच्या पतीशी संबंध असल्याचा संशय जानेवारी २०२५ मध्ये निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर झालेल्या वादानंतर, “पाच लाख रुपये दिले नाहीत तर गंभीर गुन्ह्याची तक्रार केली जाईल” अशी धमकी देण्यात आल्याचा आरोप तक्रारीत नमूद आहे.
तक्रारीनुसार, संबंधित महिला व तिच्या नातेवाइकाकडून वारंवार फोन करून दबाव टाकण्यात येत होता. पुढे जानेवारी २०२६ मध्ये, संबंधित महिलेच्या नातेवाइकाने फिर्यादीच्या मुलाशी संपर्क साधून, “पाच लाख रुपये दिले नाहीत तर दाखल केलेली तक्रार मागे घेतली जाणार नाही” अशी कथित मागणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, पैसे देण्यास नकार दिल्यानंतर दि. ०३ फेब्रुवारी २०२६ रोजी फिर्यादीच्या पतीविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला, जो पूर्णतः खोटा व दबावाखाली करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.
या प्रकरणी BNS कलम ३०८ (३), ३(५) अंतर्गत तक्रार देण्यात आली असून, मारेगाव पोलीस ठाण्यात पुढील तपास सुरू आहे. प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य परिस्थिती समोर आणावी, अशी मागणी फिर्यादी कुटुंबाने केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या