Type Here to Get Search Results !

"ज्ञान आणि नवनिर्माण हे बदलत्या काळाचे चलनी नाणे आहे." छत्रपती महोत्सवात शिवव्याख्याते प्रा.प्रवीण देशमुख यांचे प्रतिपादन

वणी : 

‎           जो समाज व्यक्तीपेक्षा व्यक्तित्वाची, माणसापेक्षा माणुसकीची, चित्रापेक्षा चरित्राची आणि प्रतिमेपेक्षा प्रतिभेची पूजा करतो, त्याच समाजाचा उद्धार होत असतो. ज्ञान आणि नवनिर्माण हे बदलत्या काळाचे चलनी नाणे आहे.असे जाहीर प्रतिपादन शिवव्याख्याते प्रा. प्रवीण देशमुख यांनी केले. ते सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित छत्रपती महोत्सव येथे बोलत होते.शिवरायांचे पहिले चरित्र लेखन करणारा पोर्तुगीज इतिहासकार कास्मो द गार्दा होय. त्याने द न्यू लॉर्ड ऑफ इंडिया असा ग्रंथ लिहिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. शिवरायांचे आर्थिक, धार्मिक, सामाजिक धोरण, महाराष्ट्राला लाभलेली संत परंपरा, वैज्ञानिक दृष्टीकोन अंगीकारणारे संवेदनशील व प्रजाहित दक्ष शिवराय अशा विविध पैलुंना त्यांनी आपल्या व्याख्यानातून स्पर्श केला.


‎                 सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित छत्रपती महोत्सवाचे अध्यक्ष अंबादास वागदरकर, प्रमुख अतिथी म्हणून वणी विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार श्री संजय देरकर,  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस संजय खाडे, नगरसेवक धनराज भोंगळे, नगरसेवक अजय धोबे, स्टेट बँकेचे व्यवस्थापक विनोद सुभेदार, जिजाऊ ब्रिगेड अध्यक्ष पौर्णिमाताई भोंगळे, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले वाचनालयाचे अध्यक्ष बाळासाहेब राजुरकर,शिवसेना (उबाठा) गटनेते सुधीर थेरे हे यावेळी विचारपीठावर उपस्थित होते. 


‎    यावेळी श्रीजा मनोज धांडे या चिमुकलीने शिवगर्जना दिली, तर स्मिरल संदीप डहाके हिने आपल्या छोट्याशा भाषणातून शिवरायांचा आदर्श घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून मंगेश खामनकर यांनी प्रबोधनातील सातत्य याचे महत्त्व विशद केले. 


‎          उदघाट्नपर मनोगतातून आमदार संजय देरकरांनी राजकीय, सामाजिक नितिमूल्यांचा होत असलेला ऱ्हास, शेतमालाच्या पडत्या भावामुळे शेतकऱ्यांची होत असलेली दयनीय स्थिती यावर प्रकाश टाकला. संजय खाडे यांनी शिकलेला समाज अंधश्रद्धेच्या आहारी जात असल्याचे सांगत चिंता व्यक्त केली.

‎ अजय धोबे यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.दरम्यान, सावित्री-जिजाऊ दशरात्रौत्सवामध्ये संपन्न झालेल्या भव्य रक्तदान शिबिरात सहपरिवार रक्तदान करणाऱ्या माधुरी व जीवन चौधरी, वंदना व प्रवीण राजूरकर, आशाकला व सुभाष गेडाम, आरती व नितीन आवारी, निशा व मंगेश खामनकर या दांपत्यांचा शाल, ग्रंथ व सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

‎        मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन झाल्यानंतर सुप्रसिद्ध गायक दिगंबर ठाकरे यांनी सुमधुर आवाजात जिजाऊ वंदना सादर केली. या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन प्रवीण खंडाळकर, नितीन मोवाडे यांनी केले. तर आभार प्रदर्शन दत्ता पुलेनवार यांनी केले.

‎         कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मारुती जीवतोडे,  ऍड. अमोल टोंगे, अभय पानघाटे, विनोद बोबडे, लक्ष्मण काकडे, अरुण डवरे, भाऊसाहेब आसुटकर , कृष्णदेव विधाते, विलास शेरकी, मारुती मोडक, शंकर  पुनवटकर, विजय दोडके, वसंत थेटे अरविंद आवारी सुरेंद्र घागे, रवींद्र चव्हाण, अमोल कळसकर, सुरेश पेंढरवाड तसेच जिजाऊ ब्रिगेडच्या सर्व महिला भगिनी यांचे सहकार्य लाभले. सदर व्याख्यानासाठी शिवप्रेमी वणीकर जनतेचा प्रचंड प्रतिसाद लाभला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

Healthy Indian Youth Image