Type Here to Get Search Results !

लायन्स इंग्लिश मिडी. स्कूलमध्ये शिवजयंती उत्सव संपन्न, विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सादरीकरणांनी रंगला सोहळा

वणी : 

‎          देशमुखवाडी येथील लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त उत्साह, जोश आणि देशभक्तीने ओथंबलेला, शिवचरित्रावर आधारित कार्यक्रम पार पडला. संपूर्ण परिसरांत शिवमय वातावरण निर्माण झाले होते.

‎        कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अकॅडेमिक डायरेक्टर, प्राचार्य प्रशांत गोडे होते, तर प्रमुख पाहुण्या म्हणून मुख्याध्यापिका सौ. चित्रा देशपांडे, पर्यवेक्षिका सौ. मनीषा कापसे व सौ संध्या बेडदेवार मॅडम मंचावर उपस्थित होत्या.

‎      कार्यक्रमाची सुरुवातच अंगावर रोमांच उभे करणाऱ्या शिवगर्जनेने झाली. इयत्ता दुसरीतील कनक उपाध्ये हिने दिलेल्या शिव गर्जनेने वातावरण भारावून गेले. त्यानंतर लावण्या नागमोते हिने आपल्या प्रभावी भाषणातून शिवरायांचे शौर्य आणि कर्तृत्व जिवंत केले.

‎     विद्यार्थ्यांच्या सादरीकरणांनी कार्यक्रमाला वेगळीच उंची मिळाली. अभिर सरमोकदम याने अफझल खान वध या प्रसंगावर दमदार पोवाडा शाहीरी शैलीत गाऊन रोमांच उभे केले, नैतिक ढुमणे, स्मिरल डहाके, जान्हवी एकरे, अर्णव मेश्राम यांच्या ओजस्वी भाषणांनी उपस्थितांना प्रेरित केले. तर रिया समरितकर हिने सादर केलेल्या हृदयस्पर्शी कवितेने सर्वांची मने जिंकली. इयत्ता चौथी च्या विद्यार्थ्यांनी जाणता राजाला साजेशे सादर केलेले शिवजन्म ते राज्याभिषेक सोहळा हे नाट्य उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारे व मुख्य आकर्षण ठरले.

‎         अध्यक्षीय भाषणात प्रशांत गोडे यांनी “शिवचरित्र हा केवळ इतिहास नाही तर, देशभक्तीचा धगधगता  यज्ञकुंड असून स्वाभिमानी जीवन जगण्याची प्रेरणा आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करणे ही काळाची गरज आहे,” असे मार्गदर्शन केले.

‎      मुख्याध्यापिका सौ. चित्रा देशपांडे यांनी मनोगतात, “छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन हे विद्यार्थ्यांसाठी आदर्श असून त्यांच्या गुणांचा अंगीकार करूनच खरे यश मिळू शकते.” असे सांगितले .

‎      कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन सौ. रंजू झाडे यांनी केले, तर सौ. वैशाली पिसे यांनी आभार मानले. शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम यशस्वी ठरला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

Healthy Indian Youth Image