Type Here to Get Search Results !

वणीत युवासेनेत खळबळ; उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांचा आक्रमक राजीनामा

वणी :

‎             युवासेनेत मोठी खळबळ उडवणाऱ्या घडामोडीत युवासेना उपजिल्हा प्रमुख (वणी विधानसभा) अजिंक्य सु. शेंडे यांनी आपल्या पदाचा आक्रमक शब्दांत राजीनामा दिला आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रातून त्यांनी स्थानिक नेतृत्वावर थेट निशाणा साधत “एकाधिकारशाही कारभारामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलले जात आहे,” असा गंभीर आरोप केला आहे.


‎       अजिंक्य शेंडे यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी निष्ठा राखत अनेक वर्षे काम केल्याचा उल्लेख करत कोविड काळातील मदतकार्य, युवक-विद्यार्थी प्रवेश मोहीम, सामाजिक उपक्रम आदींचा उल्लेख केला. मात्र, “पक्षासाठी जीवाचे रान करूनही आज कार्यकर्त्यांनाच दुय्यम वागणूक दिली जाते,” अशी संतप्त भावना त्यांनी व्यक्त केली.


‎               महत्त्वाच्या बैठका, निर्णयप्रक्रिया व नगरपरिषद सीट वाटपात जाणीवपूर्वक दूर ठेवले जात असल्याचा आरोप करत त्यांनी संघटनात्मक कामकाज ठप्प झाल्याचेही स्पष्ट केले. वणी शहरातील युवासेना शहर प्रमुख पद दीर्घकाळ रिक्त असून झरी–मारेगाव व मारेगाव भागात संघटना निष्क्रिय झाल्याची टीका त्यांनी केली आहे. चार वेळा ‘सामना’मधून नियुक्ती मिळूनही पक्षात योग्य मान-सन्मान न मिळाल्याची खंत व्यक्त करत त्यांनी “मीच म्हणजे पक्ष” अशी भूमिका घेणाऱ्या स्थानिक नेतृत्वावर अप्रत्यक्ष टीका केली.


                  “स्वाभिमान जपण्यासाठी हा निर्णय घेतला,” असे स्पष्ट करत त्यांनी पदाचा राजीनामा जाहीर केला असून, त्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे वणी विधानसभा क्षेत्रात युवासेनेतील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला आहे. या घडामोडीमुळे स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली असून आगामी काळात याचे राजकीय परिणाम काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

Healthy Indian Youth Image