नृसिंह व्यायाम शाळा प्रणित नृसिंह स्पोर्टिंग क्लब, वणी यांच्या वतीने आयोजित भव्य कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी शिवसेनेचे जिल्हा संघटक विजय बाबू चोरडिया यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत युवकांना खेळाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचे आवाहन केले.
या स्पर्धेचे उद्घाटन शिवसेनेचे जिल्हा संघटक विजय बाबू चोरडिया यांच्या हस्ते झाले, तर अध्यक्षस्थानी शिवाजी व्यायाम शाळेचे माजी अध्यक्ष प्रमोद निकुरे होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रभाग क्रमांक १४ व १३ चे नवनिर्वाचित नगरसेवक सैफुर रहेमान, शंकर झिलपे, गुलाम रसुल रंगरेज, केशव नागरी पतसंस्थेचे सचिव अनिल आक्केवार, सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रविण झाडे, संजय पावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटक म्हणून बोलताना विजय चोरडिया यांनी कबड्डी हा ग्रामीण संस्कृतीतून उगम पावलेला, ताकद, शिस्त आणि संघभावना निर्माण करणारा खेळ असल्याचे सांगितले. आजच्या युवकांनी मोबाईल आणि व्यसनांपासून दूर राहून क्रीडाक्षेत्रात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. खेळामुळे केवळ शारीरिक आरोग्यच नव्हे तर मानसिक बळ, नेतृत्वगुण आणि जिद्द विकसित होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ग्रामीण भागातील खेळाडूंना व्यासपीठ मिळावे यासाठी अशा स्पर्धा अत्यंत महत्त्वाच्या असून आयोजकांचे त्यांनी विशेष कौतुक केले. युवक घडवणीत क्रीडासंस्कृतीचा मोठा वाटा असल्याचे नमूद करत विजय चोरडिया यांनी भविष्यातही अशा उपक्रमांना सातत्याने पाठबळ देण्याची ग्वाही दिली.
विजय चोरडिया यांच्या प्रेरणादायी विचारांमुळे उपस्थित खेळाडू व क्रीडाप्रेमींमध्ये नवा उत्साह संचारला असून स्पर्धेला मोठ्या प्रतिसादाची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
कार्यक्रमास नृसिंह स्पोर्टिंग क्लबचे अध्यक्ष कुणाल ठोंबरे, उपाध्यक्ष अनिकेत वाढई, सचिव ब्रिजेश निंदेकर यांच्यासह दादा राऊत, सुधाकर काळे, रमेश उगले, पुरुषोत्तम आक्केवार, परशुराम पोटे, विशाल ठोंबरे, धर्मेंद्र काकडे आदी कार्यकर्ते व क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या