Type Here to Get Search Results !

वणी पोलिसांचा थेट प्रहार! कोंबडा जुगार अड्ड्यावर छापा

वणी :

‎               तालुक्यात खुलेआम सुरू असलेल्या कोंबडा जुगारावर अखेर वणी पोलिसांनी करारी कारवाई करत जुगार माफियांना जबरदस्त दणका दिला आहे. कुंभारखनी क्वार्टर परिसरातील जंगलसदृश भागात सुरू असलेल्या कोंबडा जुगाराच्या अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी सहा आरोपींना रंगेहाथ अटक केली आहे.

‎                  उपविभागीय पोलीस अधिकारी वणी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली. पोलीस हवालदार निलकमल भोसले यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक सुयोग महापुरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घटनास्थळी धडक दिली. पोलिसांचा छापा पडताच आरोपींमध्ये एकच खळबळ उडाली; मात्र सतर्क पथकाने सर्वांना ताब्यात घेतले.


‎        अटक आरोपींची नावे कैलास जगन पेंदोर (३०, रा. सुरला, ता. झरी-जामनी), धर्मा किसन परचाके (४३, रा. सुरला), उत्तम बोडकाजी ठाकरे (५५, रा. वेगाव, ता. मारेगाव), ऋषभ गजानन खुसपुरे (२८, रा. कोलगाव), शंकर शामराव वराटे (३२, रा. मारेगाव, ता. वणी) आणि रमेश हिरामन झाडे (४०, रा. गणेशपूर, ता. वणी) या कारवाईत आरोपींकडून ₹ ४०,६०० रोख रक्कम, ४ मोबाईल फोन, झुंजीसाठी वापरलेले ३ कोंबडे (एक जखमी), धारदार लोखंडी काती आणि बजाज सिटी १०० दुचाकी असा एकूण ₹ १,०४,१५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.


‎      कोंबड्यांच्या झुंजीवर मोठ्या प्रमाणात पैशांची बाजी लावून कायद्याची खुलेआम पायमल्ली सुरू असल्याचे या छाप्यातून स्पष्ट झाले. पोलिसांनी जप्त कोंबड्यांचा कायदेशीर लिलाव करून पुढील प्रक्रिया पूर्ण केली आहे.  या प्रकरणी सर्व आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२(ब) व १२(क) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

     अवैध जुगार चालवणाऱ्यांना वणी पोलिसांनी थेट इशारा दिला आहे. “जुगार चालवायचा असेल तर गजाआड जाण्याची तयारी ठेवा,” असा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad