आदर्श हायस्कूल येथे क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन व सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. खेळ व सांस्कृतिक कार्यक्रमांमधून विद्यार्थ्यांमध्ये मनोधैर्य, चिकाटी, खिलाडूपणा तसेच सहकार्य व संघभावना वाढीस लागते. सांघिक नृत्य व विविध खेळांमुळे नेतृत्वगुणांचा विकास होतो, असे प्रतिपादन शिक्षण प्रसार समितीचे सहसचिव महादेवराव वल्लपकर यांनी केले. ते उद्घाटनप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
यावेळी आदर्श हायस्कूल वणी येथील सहाय्यक शिक्षिका तसेच नगरपरिषद वणीच्या नगराध्यक्षा विद्याताई आत्राम यांचा शिक्षण प्रसार समितीचे सचिव तथा कार्यकारी अध्यक्ष जयसिंगराव गोहोकार व सहसचिव महादेवराव वल्लपकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना विद्याताई आत्राम म्हणाल्या, “हा सत्कार माझ्या कुटुंबाचा, विद्यार्थ्यांचा, सहकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच माझ्या कार्यक्षेत्राचा आहे. शिक्षण, आरोग्य, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात नगराध्यक्ष पदाच्या माध्यमातून वणी शहरात व्यापक व सकारात्मक परिवर्तन घडविण्यासाठी मी पुढेही योगदान देत राहीन.”
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसार समितीचे सचिव तथा कार्यकारी अध्यक्ष जयसिंगराव गोहोकार होते. विशेष मार्गदर्शक म्हणून सहसचिव महादेवराव वल्लपकर, उद्घाटक म्हणून नगराध्यक्षा विद्याताई आत्राम, तर अतिथी म्हणून नगरसेविका आरती वांढरे, अर्चना झिलपे, मनिषा गव्हाणे उपस्थित होत्या. तसेच प्राचार्य आर. एल. मोहिते व पर्यवेक्षक एस. आर. पिदुरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक एस. आर. पिदुरकर यांनी केले. संचालन विकास बलकी यांनी तर आभार वैजनाथ खडसे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.




टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या