वणी :
शहरात उघडकीस आलेल्या सुगंधी तंबाखू तस्करी प्रकरणात गुन्हा दाखल होऊन एक महिना उलटूनही आरोपींना अटक व गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त न झाल्याने पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य सुभाष शेंडे यांनी पोलीस अधीक्षक, यवतमाळ यांना अंतिम स्मरणपत्र पाठवून तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
दिनांक ८ जानेवारी २०२६ रोजी दिलेल्या लेखी निवेदनानंतर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, वणी यांच्या चौकशी अहवालात तपास सुरू असल्याचे नमूद असतानाही प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. तक्रारीत नमूद आरोपी ८ डिसेंबर २०२५ पासून मोकाट फिरत असून, तस्करीसाठी वापरण्यात आलेले MH-24-BL-7051 क्रमांकाचे वाहन अद्याप जप्त करण्यात आलेले नाही.
अजिंक्य शेंडे यांनी तपासात जाणीवपूर्वक दिरंगाई होत असल्याचा आरोप करत, संबंधित दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची व निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करण्याचीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
जर येत्या सात दिवसांत कारवाई झाली नाही, तर २६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता वणी तहसील कार्यालयासमोर तीव्र धरणे आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा युवासेनेतर्फे देण्यात आला आहे. प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे निर्माण होणाऱ्या कोणत्याही परिस्थितीस पोलीस प्रशासन जबाबदार राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणाची प्रत माहिती आमदार, विशेष पोलीस महानिरीक्षक, जिल्हाधिकारी व तहसीलदार यांनाही देण्यात आली आहे. आता पोलीस प्रशासन पुढील काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या