वणी :
सिद्धार्थ वसतीगृह, वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती अत्यंत उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. स्त्रीशिक्षणासाठी आयुष्य वेचणाऱ्या सावित्रीबाईंच्या विचारांचा जागर कार्यक्रमातून ठळकपणे संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. पुरुषोत्तम पाटील सर, प्रमुख पाहुणे नवनाथ नगराळे व प्रा. बाळासाहेब राजूरकर यांची उपस्थिती होती. सुरुवातीला सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस हार घालून पुष्पमाला अर्पण करण्यात आली व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नवनाथ नगराळे यांनी केले. त्यानंतर वसतीगृहातील बारा विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर परखड व विचारप्रवर्तक मनोगते व्यक्त केली. या स्पर्धेत विठ्ठल महादेव पारखी यांनी प्रथम क्रमांक पटकावला, यशिद राजू नैताम यांनी द्वितीय, तर साहील प्रविण आसुटकर यांनी तृतीय क्रमांक मिळविला.
विद्यार्थ्यांच्या भाषणानंतर प्रमुख पाहुणे प्रा.बाळासाहेब राजूरकर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचा सडेतोड आढावा घेतला. “ज्या काळात स्त्रीशिक्षण पाप मानले जात होते, त्या काळात सावित्रीबाईंनी शिक्षणाचा मशाल पेटवला,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
अध्यक्षीय भाषणात प्रा.पुरुषोत्तम पाटील सर यांनी सावित्रीबाई फुले यांनी स्त्रीशिक्षणासाठी स्वतःचे संपूर्ण आयुष्य अर्पण करून समाजातील अंधकार दूर केला, हे ठळकपणे मांडले. “आज प्रत्येक घरात सावित्रीबाईंचा विचार पोहोचणे ही काळाची गरज आहे,” असे स्पष्ट प्रतिपादन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे संचलन विद्यार्थी करण खुटेमाटे यांनी केले, तर आभार प्रदर्शन अधिक्षक मंगल तेलंग यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वसतीगृहाचे सेवक कैलास वडस्कर यांनी मोलाचे सहकार्य केले.
संपूर्ण कार्यक्रमातून सावित्रीबाई फुले यांचा लढाऊ विचार, स्त्रीशिक्षणाचे महत्त्व आणि सामाजिक परिवर्तनाचा संदेश ठामपणे पोहोचला.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या