वणी :
वणी शहरात चोरट्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून, भरदिवसा वर्दळीच्या ठिकाणी दुचाकी चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे शहरातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
साखरा (कोलगाव) ता. वणी येथील शेतकरी बंडु दादाजी उपासे (वय 63) यांनी वणी पोलीस ठाण्यात रिपोर्टनुसार, दि. 28 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास ते कुटुंबासह सोन्याचे दागिने खरेदीसाठी वणीतील बालाजी ज्वेलर्स येथे गेले होते. त्यांनी आपली हिरो होंडा स्प्लेंडर प्लस (MH 29 S 7908) ही काळ्या रंगाची, निळ्या पट्ट्यांची जुनी वापरती दुचाकी दुकानासमोर उभी केली होती.
दागिने खरेदी करून सायंकाळी 4.15 वाजता बाहेर आल्यानंतर त्यांची दुचाकी जागेवरून गायब झाल्याचे आढळून आले. आजूबाजूला सर्वत्र शोध घेऊनही गाडी मिळून न आल्याने, अज्ञात चोरट्याने अंदाजे 20 हजार रुपये किमतीची दुचाकी चोरून नेल्याचे स्पष्ट झाले.
विशेष म्हणजे, दिवसा-दुपारी शहरातील व्यापारी भागातच चोरी होत असल्याने चोरट्यांचे धाडस वाढल्याचे चित्र दिसत आहे. सोन्याच्या दुकानांसमोर, बाजारपेठेत, गर्दीच्या ठिकाणी वाहनसुरक्षा पूर्णपणे रामभरोसे असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.
या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बी.एन.एस.) 2023 चे कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, शहरात वाढत असलेल्या चोरीच्या घटनांकडे गांभीर्याने पाहिले नाही तर चोरट्यांचे मनोबल आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी चर्चा नागरिकांत सुरू आहे.


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या