मारेगाव :
तालुक्यातील बोरी गदाजी येथील गदाजी महाराज मंदिरात अज्ञात चोरट्यांनी केलेली चोरी ही केवळ आर्थिक गुन्हा नसून गावकऱ्यांच्या श्रद्धेवर केलेला थेट घाला असल्याची तीव्र भावना सर्वत्र व्यक्त होत आहे. देवस्थानासारख्या पवित्र ठिकाणाला लक्ष्य करून चोरट्यांनी आपली विकृत आणि निर्लज्ज मानसिकता उघड केली आहे.
दिनांक २८ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी नेहमीप्रमाणे मंदिराची पूजा करून मंदिराला कुलूप लावण्यात आले होते. त्यानंतर पुजारी दिवसभर शेतीकामासाठी गेले होते. सायंकाळी नियमित पूजेसाठी पुन्हा मंदिरात आले असता मंदिराचे कुलूपच गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. संशय आल्याने त्यांनी तात्काळ मंदिराच्या जबाबदार व्यक्तींना माहिती दिली. त्यानंतर मंदिराची संयुक्त पाहणी केली असता गर्भगृहातील तब्बल २५ वर्षांपूर्वी अर्पण केलेले चांदीचे पादुका व चांदीचा घोडा मंदिरातून चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले.
चोरट्यांनी अंदाजे एक किलो वजनाचा आणि सुमारे एक लाख रुपये किमतीचा चांदीचा मुद्देमाल लंपास केला असून, ही चोरी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे. मंदिरातील पवित्र वस्तूंवर हात टाकणे म्हणजे केवळ चोरी नव्हे तर समाजाच्या धार्मिक भावनांवर केलेला घोर आघात आहे. अशा प्रकारची कृत्ये करणारे चोरटे समाजासाठी कलंक असून, त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई होणे गरजेचे असल्याची जोरदार मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
या घटनेनंतर परिसरात संतापाचे वातावरण असून, चोरट्यांनी केवळ दागिनेच नाही तर भक्तांची आस्था, विश्वास आणि श्रद्धाही दुखावली आहे. देवाच्या नावाने अर्पण केलेल्या पवित्र वस्तू चोरणे ही अमानुष वृत्ती दर्शवते. या प्रकरणी अज्ञात इसमांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, लवकरात लवकर चोरट्यांचा शोध घेऊन त्यांना कठोर शिक्षा व्हावी, अशी सर्व स्तरातून अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
गावातील शांतता आणि धार्मिक परंपरा जपणाऱ्या या मंदिरावर झालेली ही चोरी गावकऱ्यांच्या मनात खोल जखम करून गेली असून, भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी समाजानेही सजग राहण्याची गरज व्यक्त होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या