वणी :
बी.सी.सी.आय. तर्फे आयोजित १५ वर्षांखालील ‘महिला एलीट ग्रुप बी’ लीग स्पर्धेसाठी व्ही.सी.ए.च्या विदर्भ महिला क्रिकेट संघात लायन्स स्कूलची विद्यार्थिनी स्वरा करंडे हिची सलग दुसऱ्यांदा निवड झाली आहे. ही स्पर्धा दि. २ ते १० जानेवारी २०२६ या कालावधीत विशाखापट्टणम येथे पार पडणार आहे.
स्वरा करंडे हिने बालपणापासूनच वडील मंगेश करंडे यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच क्लब व शाळेमधील नियमित व शिस्तबद्ध प्रशिक्षणातून आपले क्रिकेट कौशल्य विकसित केले आहे. विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मार्गदर्शन सत्रे व प्रशिक्षण शिबिरांमुळे तिच्या खेळात सातत्याने प्रगती होत असून तिची कामगिरी उल्लेखनीय ठरत आहे.
ती वणी येथील लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूलची इयत्ता नववीची विद्यार्थिनी असून, तिच्या क्रीडा प्रवासात शाळा प्रशासनाकडून तिला सातत्यपूर्ण सहकार्य व प्रोत्साहन मिळत आहे.
स्वराच्या या यशाबद्दल शाळेचे अध्यक्ष व माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, उपाध्यक्ष बलदेव खुंगर, लायन्स क्लबचे अध्यक्ष तुषार नगरवाला तसेच पदाधिकारी सुधीर दामले, चंद्रकांत जोबनपुत्रा, शमीम अहमद, नरेंद्र बरडिया, किशन चौधरी, महेंद्र श्रीवास्तव, डॉ. के. आर. लाल, रमेश बोहरा, अकॅडेमिक डायरेक्टर प्रशांत गोडे, प्राचार्य चित्रा देशपांडे, शिक्षक व विद्यार्थ्यांनी अभिनंदन करून तिला शुभेच्छा दिल्या.
विशाखापट्टणम येथे होणाऱ्या या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत स्वराच्या कामगिरीकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले असून, ती भविष्यात राष्ट्रीय स्तरावर विदर्भ व लायन्स स्कूलचे नाव उज्वल करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या