शिरपूर (ता. वणी) :
तालुक्यातील साखरा परिसरात सुरू असलेल्या रेल्वे सायडिंगच्या कामावर काही समाजकंटकांनी अक्षरशः दहशत माजविल्याची गंभीर घटना समोर आली आहे. काम सुरू असताना विरोध केल्याच्या कारणावरून कामगारावर लाकडी दांडक्याने मारहाण, वाहनाची तोडफोड तसेच जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची तक्रार शिरपूर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, मुंगोली गावाजवळ एका खासगी कंपनीकडून गेल्या काही महिन्यांपासून रेल्वे सायडिंगचे काम सुरू आहे. दुपारच्या सुमारास काही अनोळखी इसमांनी कामाच्या ठिकाणी येऊन अडथळा निर्माण केला. काम सुरू असल्याने हद्दीबाहेर राहण्यास सांगितल्याचा राग धरून संबंधित इसमांनी शिवीगाळ करत खुलेआम धमक्या दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
हीच टोळी सायंकाळी पुन्हा साखरा येथील नव्याने सुरू असलेल्या ग्रामपंचायत इमारतीजवळ दाखल झाली. कामगार आपल्या मित्रांसह वाहनात बसले असताना अचानक शिवीगाळ सुरू करत त्यांनी वाहनावर हल्ला चढविला. वाहनाच्या काचा व हेडलाईट फोडून मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आले.
यानंतर वाहनातून बाहेर पडताच संबंधित इसमांनी लाकडी दांडक्याने कामगाराच्या गालावर व डोक्याच्या भागावर जोरदार मारहाण केली. यावेळी “तुला जिवंत सोडणार नाही” तसेच “गाडी जाळून टाकू” अशा धमक्या देत परिसरात भीतीचे वातावरण निर्माण केल्याचे सांगण्यात येते.
या प्रकरणी शिरपूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 अंतर्गत कलम 115(1), 3(5), 324(4) व 352 351(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेमुळे रेल्वे प्रकल्पाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पुढील तपास शिरपूर पोलीस करीत असून आरोपींचा शोध सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या