वणी :
कर्मचारी भविष्य निधी संघटना (EPFO), क्षेत्रीय कार्यालय अकोला यांच्या वतीने ‘निधी आपके निकट’ या उपक्रमांतर्गत जनजागृती व तक्रार निवारण कार्यक्रमाचे आयोजन लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल (देशमुखवाडी), वणी येथे दिनांक २९ डिसेंबर रोजी सकाळी १०.०० ते सायंकाळी ४.०० वाजेपर्यंत करण्यात आले.
या कार्यक्रमास अकोला येथील ईपीएफओ क्षेत्रीय कार्यालयाचे प्रवर्तन अधिकारी श्री. संतोष पोळ, लायन्स चॅरिटेबल ट्रस्टचे उपाध्यक्ष श्री. बलदेव खुंगर, कामगार कायदे तज्ज्ञ श्री. भालचंद्र चांदे, शाळेचे प्राचार्य श्री. प्रशांत गोडे, रॉकवेल मिनरलचे एच.आर. हेड श्री. हुसैन बाशा तसेच ई.पी.एस. वणी तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष श्री. मारोती मोडक आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमांतर्गत श्री. संतोष पोळ यांनी उपस्थित कामगार व कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी (PF), पेंन्शन योजना (EPS), एम्प्लॉईज डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स (EDLI), तसेच एम्प्लॉईज एनरोलमेंट स्कीम २०२५ बाबत सविस्तर माहिती दिली. नियोक्ता व कर्मचारी यांचे हक्क, कर्तव्ये आणि सेवा सुविधांवर त्यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना (₹९९,४४६ कोटींच्या तरतुदीसह) अंतर्गत मिळणाऱ्या लाभांची माहिती देण्यात आली. यामध्ये प्रत्येक नवीन कर्मचाऱ्याला पहिल्या महिन्याचा ₹१५,००० पर्यंत पगार थेट DBT द्वारे, तसेच प्रत्येक नवीन कर्मचाऱ्यामागे नियोक्त्यास दरमहा ₹३,००० पर्यंत लाभ २ किंवा ४ वर्षांसाठी DBT स्वरूपात देण्यात येतो, अशी माहिती देण्यात आली.
तसेच पेंन्शनर्स, कामगार व कर्मचाऱ्यांच्या विविध तक्रारींचे तात्काळ निवारण करण्यात आले. 'निधी आपके निकट’ या उपक्रमाचा लाभ परिसरातील मोठ्या संख्येने कामगार, कर्मचारी व पेंन्शनर्स यांनी घेतला.





टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या