Type Here to Get Search Results !

वणी आगार व्यवस्थापकांच्या कथित अन्यायाविरोधात वाहकाचे आमरण उपोषण

वणी :

‎            वणी आगारातील वाहक मिलिंद देविदास गायकवाड (बी. क्र. ११७) यांनी वणी आगार व्यवस्थापकांकडून पदाचा दुरुपयोग करून आपल्यावर तसेच इतर चालक-वाहक कर्मचाऱ्यांवर अन्याय केला जात असल्याचा आरोप करीत, न्याय मिळावा या मागणीसाठी वणी बस स्थानक परिसरात आमरण उपोषण सुरू झाले आहे.
‎          गायकवाड यांचा आरोप आहे की, वणी आगार व्यवस्थापकांकडून वारंवार किरकोळ कारणांवर निलंबन, अनावश्यक दंड, रजा व सुट्ट्या नाकारणे, तसेच आर्थिक दंडात्मक कारवाया केल्या जात आहेत. यासंदर्भात त्यांनी यवतमाळ विभाग नियंत्रक कार्यालयाकडे वेळोवेळी तक्रारी व पुरावे सादर केले असूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.
‎         वणी आगारात केवळ आपल्याच नव्हे तर इतर चालक व वाहक कर्मचाऱ्यांवरही अन्याय होत असल्याचे सांगत, अनेक कर्मचाऱ्यांनी यासंदर्भात तक्रारी दाखल केल्याचे गायकवाड यांनी नमूद केले आहे. मात्र, प्रकरणांमध्ये दिरंगाई होत असल्याने प्रशासनाच्या भूमिकेबाबत कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी असल्याचेही ते म्हणाले.
‎         तसेच वणी आगार व्यवस्थापकांकडून शासकीय नियमांचे उल्लंघन होत असल्याबाबत, आर्थिक गैरव्यवहार तसेच आगारातील शिस्तभंगाच्या बाबींसंदर्भात विभाग नियंत्रक कार्यालय व संबंधित यंत्रणांकडे तक्रारी करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.
‎            या सर्व बाबींची चौकशी करून संबंधित आगार व्यवस्थापकांना तात्काळ पदमुक्त (निलंबित) करून बदली करावी व आपल्याला न्याय द्यावा, अशी मागणी आंदोलक वाहक मिलिंद गायकवाड यांनी केली आहे. आमरण उपोषण काळात कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची जबाबदारी संबंधित अधिकारी व प्रशासनाची राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
‎             या आंदोलनाची माहिती यवतमाळचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी, आमदार, पोलीस अधीक्षक, विभाग नियंत्रक, सुरक्षा व दक्षता विभाग तसेच वणी पोलीस ठाण्यास देण्यात आली आहे. तक्रारींसोबत आवश्यक कागदपत्रे व पुरावे जोडण्यात आले असल्याचे आंदोलकांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad