प्रतिनिधी / मंगेश राऊत (उसेगाव) :
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांच्यात आत्मविश्वास, विवेकशील विचार व सामाजिक बांधिलकी निर्माण करण्याच्या उद्देशाने नेचर फाउंडेशन, नागपूर यांच्या वतीने चिमूर तालुक्यातील शिवापूर (बंदर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दिनांक २५ ते २८ डिसेंबर २०२५ दरम्यान चार दिवसीय ‘उच्च शैक्षणिक बदलासाठी बांधिलकी ४.०’ शिबिर यशस्वीपणे पार पडले.
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी या शिबिरात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सामाजिक परिवर्तनाचा निर्धार व्यक्त केला. ग्रामीण विद्यार्थ्यांना आजही उच्च शिक्षण, शिष्यवृत्ती, करिअर संधी व प्रशासकीय प्रक्रियांबाबत अज्ञान व दिशाभूल सहन करावी लागत असल्याची वास्तव स्थिती लक्षात घेऊन नेचर फाउंडेशनकडून दरवर्षी बांधिलकी शिबिराचे आयोजन केले जाते. या शिबिरातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, व्यक्तिमत्त्व घडण, वैज्ञानिक दृष्टिकोन व सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
मानव अधिकार संरक्षण मंचचे आशिष फुलझले व अध्यक्ष अॅड. तेलंग यांनी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांकडून होणाऱ्या आर्थिक लुटीमागील यंत्रणा व त्यावर उपाययोजना यांची सखोल माहिती दिली. तर अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य युवा संघटक पंकज वंजारे यांनी विवेकवाद, अंधश्रद्धा निर्मूलन आणि आजच्या युवकाची भूमिका यावर प्रभावी मार्गदर्शन केले.
शिबिरादरम्यान विद्यार्थ्यांसाठी आयोजित जंगल सफारीतून बफर झोन, कोर झोन, संक्रमण क्षेत्र, वन्यजीव निरीक्षण, औषधी वनस्पती, टायगर कॉरिडॉर, पर्यावरण संरक्षण तसेच मानव–वाघ संघर्ष याविषयी प्रत्यक्ष अनुभवातून माहिती देण्यात आली. सिद्धांत हातगडे यांनी ‘आनंदाचे विज्ञान’ या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
नेचर फाउंडेशनचे संस्थापक निलेश नन्नावरे यांनी संस्थेच्या पाच वर्षांच्या सामाजिक कार्याचा आढावा पीपीटीद्वारे सादर करत विद्यार्थ्यांना सामाजिक बांधिलकीचे महत्त्व पटवून दिले. अॅड. बोधी रामटेके (इरास्मस मुंडस स्कॉलर) यांनी शोषित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रश्न विचारणारा सजग युवक घडणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले.
डॉ. गार्गी सपकाळ यांनी मानसिक आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करत युवा वर्गाने बदलाची सुरुवात स्वतःपासून करावी, असा संदेश दिला. प्रदीप पाल महाराज यांच्या कीर्तनातून शिक्षणाचे महत्त्व भावनिक पातळीवर अधोरेखित करण्यात आले.
शिबिरार्थ्यांच्या माध्यमातून सातारा व शिवापूर (बंदर) ग्रामपंचायतींचे सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक सर्वेक्षण करण्यात आले. लोकशाही, शैक्षणिक वास्तव, वैज्ञानिक दृष्टिकोन, लैंगिक असमानता, कॉलेजकडून होणारी विद्यार्थ्यांची लूट, विविध शिष्यवृत्ती, कला क्षेत्रातील संधी तसेच स्पर्धा परीक्षेपलीकडील करिअर संधी यावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. दररोज अनापान ध्यानाने शिबिराची सुरुवात होत होती. देशातील ज्वलंत विषयांवर पथनाट्य सादर करून गावात जनजागृतीही करण्यात आली.
शिबिरार्थ्यांनी सामाजिक लोकसहभागातून उभ्या राहिलेल्या आदर्श सातारा गावाला भेट देत सरपंच गजू गुलधे यांची मुलाखत घेतली. एकजूट व सकारात्मक दृष्टिकोनातून बदल शक्य असल्याचा विश्वास विद्यार्थ्यांमध्ये दृढ झाला.
शिबिराचे उद्घाटन पंकज वंजारे यांच्या हस्ते झाले. प्रमुख उपस्थितीत नेचर फाउंडेशनचे संस्थापक निलेश नन्नावरे, उपाध्यक्ष बादल श्रीरामे, सदस्य आशिष जीवतोडे, अमोल कावरे यांच्यासह समन्वयक वैभव, सुरज, मंगेश, गुंजन, रुचिका, युगराज, पंकज, सतीश, प्राची, लोकिता, रीशल, साक्षी, अमित आदी उपस्थित होते.
“ग्रामीण भागातील पालक व विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षणाबाबतचे अज्ञान दूर करून त्यांना योग्य दिशा देणे ही आमची जबाबदारी आहे. भविष्यात ग्रामीण विद्यार्थी धोरणनिर्मितीत अग्रेसर होतील, असा विश्वास आहे,”
— निलेश नन्नावरे, संस्थापक, नेचर फाउंडेशन









टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या