तालुक्यातील चिखलगाव परिसरात बुधवारी सायंकाळी एक अत्यंत दुर्दैवी व धक्कादायक घटना उघडकीस आली. उच्चशिक्षित व प्रतिष्ठित महिला महाविद्यालयाच्या प्राचार्य पदावर कार्यरत असलेल्या एका शिक्षिकेचा त्यांच्या राहत्या घरात मृत्यू झाल्याची घटना समोर येताच संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे.
युगंधरा स्वप्नील खरबडे (वय अंदाजे ३५) असे मृत शिक्षिकेचे नाव असून त्या चिखलगाव येथील महादेव नगर परिसरातील बहुमजली इमारतीतील एका फ्लॅटमध्ये वास्तव्यास होत्या. त्या राजकुंवर महिला महाविद्यालयाच्या प्राचार्य होत्या. कर्तृत्ववान, शांत स्वभावाच्या आणि विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय असलेल्या प्राचार्यांचा असा अंत सर्वांनाच हादरवून टाकणारा ठरला आहे.
बुधवारी सकाळी त्यांचे पती कामानिमित्त घराबाहेर गेले होते. सायंकाळी घरी परतल्यानंतर घरातून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने संशय निर्माण झाला. त्यानंतर घरात घडलेली घटना समोर येताच कुटुंबीय, शेजारी आणि परिसरात एकच शोककळा पसरली.
घटनेची माहिती मिळताच वणी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून उत्तरीय तपासणीसाठी वणी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. मृत शिक्षिकेच्या आई-वडिलांना घटनेची माहिती देण्यात येताच ते तातडीने वणी येथे दाखल झाले.
विशेष म्हणजे, युगंधरा खरबडे यांच्या पश्चात पती, १३ वर्षांचा मुलगा आणि अवघ्या ३ महिन्यांची चिमुकली मुलगी असा परिवार आहे. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी महादेव नगर येथे स्वतःचे घर खरेदी केले होते. सर्व काही सुरळीत दिसत असताना हा दुर्दैवी प्रकार कसा घडला, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत. शिक्षण क्षेत्राला हादरवणारी ही घटना असून वणी तालुक्यात शोककळा पसरली आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या