Type Here to Get Search Results !

विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षकांनी अद्ययावत राहावे – विद्याताई आत्राम

 

‎वणी :

‎                २१ वे शतक हे स्पर्धेचे युग आहे. क्षणोक्षणी ज्ञानाचा प्रचंड वेगाने विस्तार होत आहे. अशा परिस्थितीत नगर परिषद शाळांमध्ये शिक्षण घेणारी मुले या स्पर्धेत कुठेही मागे राहू नयेत, यासाठी शिक्षकांनी स्वतः सतत अद्ययावत राहणे अत्यंत गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना आपल्याकडील सर्वोत्तम देण्यासाठी शिक्षकांनी आधुनिक ज्ञान, तंत्रज्ञान आणि नव्या शैक्षणिक धोरणांची माहिती आत्मसात केली पाहिजे, असे प्रतिपादन वणी नगर परिषदेच्या अध्यक्षा विद्याताई आत्राम यांनी केले.

‎          त्या नगर परिषद शिक्षण विभागाच्या वतीने नगर परिषद शाळा क्रमांक ७ येथे आयोजित शिक्षण परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण सभापती सोनाली निमकर या होत्या. प्रमुख अतिथी म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशोर चांदेकर उपस्थित होते.

‎               प्रास्ताविकात प्रशासन अधिकारी गजानन कासावार यांनी शिक्षण परिषदेच्या आयोजनामागील उद्देश स्पष्ट करत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत शिक्षकांकडून अपेक्षित भूमिका व जबाबदाऱ्यांचे विवेचन केले. अध्यक्षीय भाषणात शिक्षण सभापती सोनाली निमकर यांनी शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण सदैव तत्पर असल्याचे आश्वासन देत शिक्षकांकडून गुणवत्तापूर्ण शिक्षणाची अपेक्षा व्यक्त केली.

‎           यानंतर सुलभक म्हणून शाळा क्र. ७ च्या शिक्षिका शुभांगी वैद्य यांनी ‘निपुण महाराष्ट्र’ अंतर्गत लीडर माता-पालक या विषयावर मार्गदर्शन केले. दिगंबर ठाकरे यांनी मूल्यसंवर्धन या विषयावर सविस्तर मांडणी केली. शाळा क्र. ८ चे शिक्षक अविनाश तुंबडे यांनी डॉ. जयंत नारळीकर गणित व विज्ञान अध्ययन समृद्धी या उपक्रमाविषयी मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी कशी करावी, याचे प्रात्यक्षिकाद्वारे स्पष्टीकरण दिले. तसेच अध्ययन स्तर नोंदणीबाबत आढावा घेऊन मार्गदर्शन करण्यात आले.

‎         या वेळी शिक्षकांना प्रत्यक्ष अध्यापन करताना येणाऱ्या अडचणींवर चर्चा करून त्यावर उपाय सुचविण्यात आले. ‎कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केंद्र समन्वयक चंदू परेकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन विजय चव्हाण यांनी केले. या शिक्षण परिषदेला सर्व मुख्याध्यापक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

Healthy Indian Youth Image