वणी नगर परिषदेवर जनतेने दिलेल्या स्पष्ट आणि निर्णायक कौलाने भारतीय जनता पार्टीने सत्ता काबीज करत वणीच्या राजकारणात आपले वर्चस्व पुन्हा एकदा ठसठशीतपणे सिद्ध केले आहे. स्वामी विवेकानंद व माँ जिजाऊ यांच्या जयंतीच्या पावन मुहूर्तावर सोमवार, दि. १२ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. विद्याताई खेमराज ऊर्फ सचिन आत्राम तसेच सर्व नगरसेवकांचा भव्य, शक्तिप्रदर्शन करणारा पदग्रहण समारंभ नगर परिषद वणी येथे पार पडणार आहे.
हा पदग्रहण सोहळा म्हणजे केवळ औपचारिक कार्यक्रम नसून, वणी शहरात विकासाभिमुख, पारदर्शक आणि निर्णायक प्रशासनाच्या नव्या युगाची अधिकृत घोषणा असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. निवडणुकीत जनतेने दिलेला स्पष्ट संदेश आता कृतीत उतरवण्याचा निर्धार भाजप नेतृत्वाने व्यक्त केला आहे.
या दणदणीत सत्तास्थापनेच्या सोहळ्यास राज्य व केंद्रातील भाजपचे वजनदार नेते उपस्थित राहणार असून, महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री मा. ना. अशोक उईके, माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री मा. हंसराज भैया अहिर, माजी गृह राज्यमंत्री मा. मदनभाऊ येरावार, वणी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार मा. संजिवरेड्डी बोदकुरवार, भाजपा यवतमाळ जिल्हाध्यक्ष मा. अॅड. प्रफुल चौहान, जिल्हा समन्वयक मा. नितीन भुतडा तसेच माजी नगराध्यक्ष व माजी जिल्हाध्यक्ष मा. तारेंद्र बोर्डे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
पदग्रहणानंतर आयोजित “स्त्री शक्तीचा सन्मान” हा विशेष कार्यक्रम भाजपच्या नेतृत्वाखाली महिलांना सत्तेच्या केंद्रस्थानी आणण्याच्या राजकीय भूमिकेचे स्पष्ट दर्शन घडवणारा ठरणार आहे. महिला नेतृत्व, विकास आणि निर्णयक्षमता यांचा संगम या कार्यक्रमातून अधोरेखित होणार आहे.
वणी शहराच्या विकासाची दिशा ठरवणाऱ्या या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टी वणी शहर यांच्या वतीने करण्यात आले आहे.




टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या