शहरातील वणी–यवतमाळ मार्गावर भरधाव वाहनांच्या निष्काळजीपणामुळे आणखी एका निष्पाप नागरिकाचा बळी गेला आहे. दिनांक १२ जानेवारी २०२६ रोजी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास लालपुलीया येथील अमित ढाब्यासमोर एका अज्ञात बोलेरो पिकअपसारख्या वाहनाने पायदळ जाणाऱ्या मजुराला जोरदार धडक दिली, यात चेंडकु रामभाऊ आत्राम (वय ५२, रा. पळसोणी, ता. वणी, जि. यवतमाळ) यांचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, मृतक आत्राम हे आपली दुचाकी केरला टायर्सजवळ लावून जेवणासाठी रस्ता ओलांडत असताना, मारेगाव/यवतमाळकडून वणीकडे येणाऱ्या बोलेरो पिकअप वाहनाने त्यांना ठोस मारली. अपघातानंतर संबंधित चालकाने जखमी अवस्थेतील आत्राम यांना कोणतीही मदत न करता वाहनासह घटनास्थळावरून पलायन केले.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ आत्राम यांना वणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, भरधाव वाहनांवर नियंत्रण ठेवण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
या प्रकरणी मृतकांचे पुत्र वैभव चेंडकु आत्राम (वय २२) यांनी वणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, त्यावरून अज्ञात बोलेरो पिकअप चालकाविरुद्ध कलम २८१ व १०६(१) भा.न्या.सं. अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा तपास पोहेका अविनाश चिकराम, पोलीस ठाणे वणी करीत आहेत.
दरम्यान, अपघातप्रवण ठिकाणी वेगमर्यादा फलक, सीसीटीव्ही कॅमेरे तसेच रात्रीची पोलीस गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. फरार चालकाला तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या