नगरपरिषदेतील नामनिर्देशित सदस्यांच्या निवडीने आता थेट राजकीय रणधुमाळीचे स्वरूप धारण केले असून, सोमवारी होणाऱ्या अधिकृत घोषणेकडे संपूर्ण शहराचे लक्ष खिळले आहे. अर्ज छाननीची प्रक्रिया पूर्ण होताच कुणाचा मार्ग मोकळा झाला, तर कुणाचे राजकीय स्वप्न छाननीतच धुळीस मिळाले आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) कडून नामनिर्देशनासाठी सादर करण्यात आलेला शत्रुघ्न मारोती मालेकर यांचा अर्ज जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पूर्णतः वैध ठरवण्यात आला आहे. त्यामुळे मालेकर यांचा नगरपरिषदेत प्रवेश जवळपास निश्चित मानला जात असून, शिवसेनेच्या गोटात जल्लोषाचे वातावरण आहे.
दुसरीकडे भाजपला मात्र धक्का बसला आहे. पक्षाकडून सादर करण्यात आलेल्या चार अर्जांपैकी अंकुश बोढे यांचा अर्ज थेट अपात्र ठरवण्यात आल्याने भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. उर्वरित किशनलाल खुंगार, रविंद्र बेलुरकर आणि अनिल आक्केवार यांचे अर्ज पात्र ठरले असले, तरी यापैकी नेमकी कुणाला संधी मिळणार, याबाबत प्रचंड चुरस निर्माण झाली आहे.
उपविभागीय अधिकाऱ्यांनी सखोल छाननी करून अहवाल तयार केला असून तो नगरपरिषदेकडे सादर करण्यात आला आहे. सोमवारी होणाऱ्या बैठकीत भाजप गटनेते राकेश बुग्गेवारे हे पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार अंतिम नाव जाहीर करणार आहेत. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय लॉबिंग, दबावतंत्र आणि अंतर्गत हालचालींना वेग आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या